नाशिक (Nashik) : नाशिक सहकारी साखर कारखान्याप्रमाणेच नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (NDCC Bank) निफाड सहकारी साखर कारखानाही २५ वर्षे भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राबवण्यात आलेल्या टेंडर (Tender) प्रक्रियेत बी.डी. कडलग कंस्टक्शन प्रा. लि. या कंपनीचे टेंडर जिल्हा बँके प्रशासनाने मंजूर केले आहे. जवळपास पंधरा वर्षांपासून बंद असलेला निफाड कारखाना भाडेतत्वावर देऊन जिल्हा बँकेला उत्पन्न मिळण्यास सुरवात झाल्यास जवळपास १५० कोटींचे बुडीत कर्जावरील एनपीए कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच निफाडच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांचीही दरवर्षी ऊस तोडणीसाठी होणारी परवड थांबण्यात मदत होणार आहे.
निफाड सहकारी साखर कारखाना एकेकाळी देशातील सर्वोत्तम साखर कारखान्यांपैकी एक होता. मात्र, गैरव्यवस्थापनचा बळी ठरल्याने कारखान्यावरील कर्जाचे हप्ते फेडण्याचीही क्षमता उरली नाही. यामुळे पंधरा वर्षापूर्वी हा कारखाना बंद पडला होता. जिल्हा बँकेकडून निफाड कारखान्याने घेतलेले कर्ज थकल्यामुळे मुद्दल व व्याज मिळून १५० कोटींची थकित रक्कम झाली आहे. कर्जफेड होत नसल्याने जिल्हा बँकेने दहा वर्षांपर्वी कारखान्याची मालमत्ता जप्त केली असून १५० कोटींचे कर्ज बुडीत खात्यात टाकले आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या एनपीएत भर पडली आहे. कारखाना सुरू व्हावा, यासाठी काही वर्षांपासून विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू होते. कारखाना सुरू व्हावा, यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून यापूर्वी अनेकदा आंदोलनेही झाली आहेत. यामुळे जिल्हा बँकेने अनेकदा टेंडर प्रक्रिया राबवून कारखाना चालवण्यास देण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेगवेगळ्या कारणांनी या प्रयत्नांना यश येत नव्हते.
काही महिन्यांपासून जिल्हा बँक प्रशासनाकडून साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याविषयीच्या हालचाली सुरू होत्या. जिल्हा बँकेने प्रसिद्ध केलेल्या टेंडरमध्ये पाच मक्तेदारांनी भाग घेतला होता. जिल्हा बँक प्रशासनाकडून सोमवारी (ता. १०) सायंकाळी टेंडर प्रक्रिया उघडण्यात आली. या प्रक्रियेत नाशिक शहरातील प्रसिद्ध बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीने सर्वांत चांगली ऑफर दिल असल्याने ते टेंडर मंजूर करण्यात आले. यामुळे साखर कारखाना सुरू होण्याचा मार्ग निघाला आहे. निफाड सहकारी साखर कारखान्याची सूत्रे यापुढे २५ वर्षे बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.