Mnerga Tendernam
उत्तर महाराष्ट्र

Nashik : वर्षभरात 41 हजार कुटुंबांनी घेतला मनरेगाच्या योजनांचा लाभ

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : एकेकाळी रोजगार हमी योजनेचे रस्ते, बंधारे या सार्वजनिक स्वरुपाची कामे करून दुष्काळी भागातील मजुरांना रोजगार मिळवून देणारी योजना असे स्वरुप होते. मात्र, मागील काही वर्षांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक लाभाच्या योजनांचा मोठ्याप्रमाणावर समावेश करण्यात आल्यामुळे नागरिकांचा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

नाशिक जिल्ह्याचा विचार करता मागील आर्थिक जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या 45375 कामांपैकी जवळपास 41000 नागरिकांनी वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात आला आहे. यात सर्वाधिक लाभ घरकुल योजनेतील लाभार्थ्यांनी घेतला असून त्या खालोखाल  फळबाग लागवड, गुरांचा गोठा, बांधावरील फळबाग लागवड, सिंचन विहिरी या वैयक्तिक कामांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्याने यावर्षी प्रथमच रोजगार हमी योजनेतून 101 कोटींची कामे केली असून त्यातील जवळपास नव्वद टक्के रक्कम वैयक्तिक लाभांच्या योजनांवर खर्च झाल्यामुळे या योजनेतून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी लाभ होत असल्याचे दिसत आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून 67 कामे वैयक्तिक स्वरूपाची व 197 कामे सार्वजनिक स्वरूपाची असे एकूण 264 कामे हाती घेण्यात येतात. वैयक्तिक स्वरुपाच्या कामात वैयक्तिक सिंचन विहिरी, गाय गोठे, कुक्कुटपालन शेड, बांधावर फळबाग लागवड, जुनी भात खाचरे दुरुस्ती, शोषखड्डे, वैयक्तिक शौचालय, शेततळे, दगडी बांध, बांधावर वृक्ष लागवड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, तुती लागवड, विहीर पुनरर्भरण, नॅडेप खत, रेशीम लागवड आदी कामांचा समावेश होता. तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या कामांमध्ये रस्ते तयार करणे, सार्वजनिक शौचालय, पेव्हर ब्लॉक, सिमेंट नाला बांध, भुमीगत गटारी, खेळाचे मैदान, सलग समतल चर इत्यादी कामे हाती घेण्यात येतात.

या योजनेतून नाशिक जिल्हयात 2022-23 या आर्थिक वर्षात 27.22 लक्ष मनुष्यदिवस निर्मिती करून 101 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला. आतापर्यंतचा हा सर्वाधिक खर्च आहे. मागील आर्थिक वर्षात तयार करण्यात आलेल्या रोजगार हमी आराखड्यात 45375 कामे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी 16268 कामे पूर्ण करण्यात आलेली असून उर्वरित 29107 कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांमध्ये 41000 कामे वैयक्तिक स्वरुपाची आहेत. त्यातील सर्वाधिक 21527 कामे घरकुल योजनेतील आहेत. घरकूल योजनेतून वैयक्तिक शौचालयाची कामे  रोजगार हमी योजनेतून करता येतात. यामुळे या योजनेमुळे जिल्ह्यातील 21527 कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे. त्याखालोखाल फळबाग लागवड योजनेचा 8933 शेतकऱ्यांनी फायदा करून घेतला आहे. रोजगार हमी योजनेतून गुरांचा गोठा योजना राबवली जाते. या योजनेतून 6677 पशुपालक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यात वैयक्तिक लाभाच्या जवळपास पंधरा योजना राबवल्या गेल्या असून त्यातून 41000 शेतकरी व ग्रामीण कुटुंबांनी त्याचा लाभ घेतला असल्याचे दिसत आहे.

वैयक्तिक लाभाच्या योजना व लाभार्थी संख्या
घरकूल  : 21573
फळबाग : 8933
गुरांचा गोठा : 6677
बांधावरील फळबाग लागवड : 1338
सिंचन विहिरी : 800
बांधावरील वृक्षलागवड : 732
विहीर पुनर्भरण : 260
वैयक्तिक शौचालय : 223
गांडूळ खत : 99
नॅडेप खत : 56
तुती लागवड : 72
रेनवॉटर हार्वेस्टिंग : 44
शेततळे : 37