नाशिक (Nashik) : गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील आरोग्य व इतर विभागांतील एकूण १८ हजार ९३९ पदे भरती प्रक्रिया राबवण्यासाठी ग्रामविकास विभागाने आयबीपीएस या कंपनीची नियुक्ती केली आहे. त्यानंतर जिल्हा परिषदांनी लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवावी अशा सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत, यामुळे नाशिकसह राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील गट क कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच या भरती प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.
ग्रामविकास विभागाने २०१९ मध्ये सुरू केलेली आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ४ मे २०२० शासननिर्णयान्वये बंद करण्यात आली होती. कोरोना संकट कमी झाल्यानंतर ती भरती प्रक्रिया पुन्हा सुरूकेली, पण त्यात तांत्रिक अडचणी आल्याने ती भरती थांबली असतानाच राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अंदाजे ७५ हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचे जाहीर केले. सरकारने जाहीर केल्यानुसार, १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी सर्व संबंधित पदे भरावयाचीआहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क ची सर्व विभागातील पदभरती कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादित दोन वर्षे शिथिलताही देण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्व पदांची बिंदुनामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी ग्रामविकास विभागाने आयबीपीएस कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची भरती, गेल्या चार वर्षापासून रखडल्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे सर्व जिल्हा परिषदांनी पदभरतीबाबत संक्षिप्त टिप्पणी तयार करावी, ज्यामध्ये शासनस्तरावर पदभरतीसाठी झालेली कार्यवाही आणि जिल्हा परिषद स्तरावर करण्यात आलेल्या पदभरतीबाबतची सद्य:स्थितीचा अंतर्भाव असावा, तसेच आगामी परीक्षा घेण्याबाबतचे नियोजन असावे. जिल्हा परिषदांनी पदभरतीची माहिती शंकानिरसन करण्याकरिता हेल्पलाइन क्रमांक सुरू करावा आणि पदभरती विषयास सर्वोच्च प्राथमिकता देऊन पदभरतीला विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना पाठवलेल्या पत्रात स्पष्टपणे सांगितले आहे.
नाशिक जि.प.मध्ये २५३८ रिक्त पदे
नाशिक जिल्हा परिषदेमध्ये सद्यःस्थितीत २ हजार ७२६ जागा रिक्त आहेत. यामध्ये २ हजार ५३८ जागा या वर्ग ३ च्या आहेत. या जागांसाठी ही भरती होण्याची शक्यता आहे. यासाठी ३१ जानेवारीपर्यंत रिक्त जागांचा तपशिल, संवर्गानुसार आरक्षण याचा सविस्तर अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. यामुळे लवकरच याबाबत नोकरभरती जाहिरात प्रसिद्ध होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.