Pune Railway Station Tendernama
पुणे

Pune: पुणे स्टेशनवरून प्रवास करणाऱ्यांना रेल्वेचा दिलासा...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे-मिरज रेल्वे मार्गावर (Pune - Miraj Railway Line) दोन सेक्शनचे काम फेब्रुवारीमध्ये संपेल. त्यामुळे मार्च किंवा एप्रिल महिन्यात पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगचे काम सुरू करा. शिवाय यासाठी असलेला ब्लॉकचा कालावधी कमी करा, प्रवाशांना जास्त त्रास होऊ देऊ नका, अशा सूचना मध्य रेल्वेचे नूतन सरव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी कन्स्ट्रक्शन विभागाला दिले आहे.

मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवानी हे पुणे विभागाच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी लोणावळा-पुणे विभागाची विंडो ट्रेलिंग पाहणी केली. तसेच पुणे स्थानकाची पाहणी करून विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता राजेश अरोरा, प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक मनजित सिंह, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (स्टेशन विकास) व्ही. के. अग्रवाल, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी. के. सिंग उपस्थित होते.

पुणे रेल्वे स्थानकाची पाहणी केल्यावर पुणे विभागात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यार्ड रिमॉडेलिंगचे काम २८९ दिवस चालणार असल्याचे कन्स्ट्रक्शन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर हा कालावधी आणखी कमी करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी पुणे स्थानकावर सुरू असलेली विविध कामे, विविध प्रवासी सुविधा, सर्व प्रतीक्षालय, शौचालय, फूट ओव्हरब्रीज, एक स्थानक एक उत्पादन, स्टॉल, स्टेशन परिसर या सर्वांचा त्यांनी बारकाईने आढावा घेतला. त्यांनी येथील खानपान वस्तूंची गुणवत्ता पाहिली आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती घेतली.

यावेळी पुणे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ. स्वप्नील नीला, वरिष्ठ विभागीय यांत्रिक व्यवस्थापक ज्वेल मॅकेन्झी यांच्यासह स्टेशन डायरेक्टर डॉ. रामदास भिसे आदी अधिकारी उपस्थित होते.