Parking Tendernama
पुणे

बापरे, अवघ्या 3 दिवसांसाठी 3 हजार रुपये पार्किंग शुल्क! काय आहे प्रकार?

टेंडरनामा ब्युरो

आळंदी (Alandi) : आळंदी नगरपरिषदेच्या ठेकेदाराने (Contractor) चार महिन्यांपूर्वीच्या आषाढी वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांकडून दिंडीची वाहने रस्त्यावर उभी केली तरी वाहनतळ शुल्क आकारले होते. एका ट्रक कडून तीन दिवसांसाठी तीन हजार रुपये शुल्क आकारून बनावट पावती दिली होती. यामुळे आता कार्तिकी वारीतही वारकऱ्यांच्या वाहनांना शुल्कचा भुर्दंड बसणार का की शुल्कमाफी देणार, असा प्रश्‍न वारकऱ्यांना पडला आहे.

आषाढी वारीच्या वेळी ठेकेदाराने वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांनाही सोडले नाही. आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीसाठी राज्यभरातून वारकरी येतात. त्यांच्या दिंडीची तंबूचे साहित्य, जेवणाचा किराणा माल, भजनाचे साहित्य ठेवण्यासाठी ट्रकसोबत आणलेले असतात.

प्रस्थानापूर्वीच सर्व दिंड्यांचे ट्रक येणार असल्याने काही ट्रकवाले धर्मशाळेच्या आवारात ट्रक उभे करतात तर काहींना जागेचा अभाव असल्याने धर्मशाळेपुढील रस्त्यावर वाहने उभे करतात. तरीही ट्रकचालकांकडून प्रत्येक तीन दिवसांसाठी तब्बल तीन हजार रुपये शुल्क घेतले जाते. सोबत मुख्याधिकारी यांची पावतीवर बनावट सही केली होती. खरे तर वारी काळात सूट दिली जाते.

पालिकेच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी

आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावर कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. मात्र आळंदीत अशा तऱ्हेने पद्धतशीर पावती देऊन वाहनतळ शुल्क आकारले जाते. यामुळे वारकऱ्यांनी पालिकेच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

आता कार्तिकी वारी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. २३ नोव्हेबर ते एक डिसेंबर कालावधीत यात्रा भरत आहेत. यामुळे कार्तिकी वारीत तरही वारकऱ्यांच्या वाहनांचे शुल्क माफ करणार का, असा सवाल विचारला जात आहे.

कार्तिकी वारीमध्ये अशा प्रकारे कुठलेही शुल्क वाहनतळासाठी घेतले जाणार नाही. सध्या याबाबतचा ठेका बंद आहे. नगर परिषद मालकीची वाहनतळाची जागा सालाबादप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात लिलाव करून व्यापाऱ्यांना दिली जाते. बेकायदा कुणी वाहनतळ शुल्क नगरपरिषदेच्या नावाखाली घेतले तर तत्काळ पोलिस किंवा नगरपरिषदेशी संपर्क साधावा.

- कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद