पुणे (Pune) : पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी पुणे शहरातील नाले आणि पावसाळी गटारे साफ करण्यासाठी तब्बल ११ कोटी रुपयांचे २८ टेंडर मंजूर केले आहेत. मंगळवारी त्यास प्रशासक विक्रम कुमार यांनी घेतलेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यातील बहुतांशी महापालिकेने निश्चित केलेल्या पूर्वगणनपत्रकापेक्षा ३५ टक्के ते ४२ टक्के कमी दराने आल्या आहेत. यंदा वेळेत नालेसफाई करण्याचे आश्वासन विक्रम कुमार यांनी सुरवातीलाच दिले होते. आता ते आपला शब्द पाळणार का, याकडे सर्व पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील कचरा, वाढलेले गवत यासह पाण्याच्या प्रवाहात येणारे अडथळे काढण्यासाठी टेंडर काढले जाते. त्याचप्रमाणे शहरातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी गटारे टाकलेल्या असतात, त्यांची देखील सफाई करणे आवश्यक असते. महापालिकेवर प्रशासक आल्यानंतर वेळेत नालेसफाई करणार असे विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले होते. महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नाले व पावसाळी गटारे साफ करण्यासाठी टेंडर मागविले होते. त्यामध्ये नाले सफाईची १३ टेंडर आणि पावसाळी गटारांची १५ टेंडर स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी आले होते. त्यास नुकतीच मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी नाले सफाईसाठी सरासरी ७५ लाख रुपये तर पावसाळी गटारांच्या स्वच्छतेसाठी सरासरी ४९ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेने मागविलेल्या टेंडरमध्ये ही सर्वच कामे पूर्वगणनपत्रकापेक्षा ३५ ते ४२ टक्क्यांपर्यंत कमी दराने आल्या आहेत. त्या सर्व मान्य करण्यात आल्या आहेत. तर केवळ भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाची नाले सफाईचे टेंडर १० टक्के कमी दराने आले होते, त्यास बैठकीत मान्यता देण्यात आलेली नाही.
३२ टक्के अनामत रक्कम
महापालिकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा कमी दराने टेंडर आले असेल तर, टेंडरच्या १० टक्के कमी दरापर्यंत एक टक्का रक्कम अनामत रक्कम म्हणून घेतली जाते. तर १० टक्क्याच्या पुढे प्रत्येक टक्क्यासाठी एक टक्का रक्कम घेतली जाते. त्यामुळे जी टेंडर ३५ टक्के ते ४२ टक्क्यांपर्यंत कमी दराने आल्या आहेत, त्या ठेकेदाराकडून २५ ते ३२ टक्के रक्कम अनामत रक्कम म्हणून घेतली जाणार आहे, त्यामुळे त्यांना कामे व्यवस्थितच करावे लागतील, असे प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
अशी आहे स्थिती...
- जुन्या हद्दीसह समाविष्ट गावातील नाल्यांची लांबी - ६४७ किमी
- पावसाळी गटारी - १५० किमी
- चेंबर्सची संख्या - ३१०००
- नाले सफाईच्या टेंडरची संख्या - १३
- पावसाळी गटारांच्या टेंडरची संख्या - १५
- एकूण रक्कम - १०.८९ कोटी