PMP Bus Pune Tendernama
पुणे

PMP: ऐन उन्हाळ्यात 'पुण्यदशम'चा AC का झाला बंद?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : प्रवाशांना गारेगार प्रवास देण्यासाठी सुरू झालेली ‘पुण्यदशम’ बस आता नॉन एसी झाली आहे. या बसमधील वातानुकूलित यंत्रणा नेहमीच बंद असते. गेल्या तीन वर्षांपासून हीच स्थिती राहिल्याने आता पीएमपी प्रशासनाने प्रवाशांना बसच्या खिडक्या उघड्या ठेवण्यास सांगितले आहे. ऐन उन्हाळ्यात वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने प्रवाशांची मात्र प्रचंड गैरसोय होत आहे.

मोठा गाजावाजा करत सुरू झालेली 'पुण्यदशम' ची सेवा विविध कारणांमुळे चर्चेत राहिली. ‘अटल’ सेवा म्हणून ही सेवा अवघ्या पाच रुपयांत देण्यात आली. नंतर तिकीट १० रुपये करण्यात आले. ‘दस में बस’ या शीर्षकाखाली शहरातील मध्यवर्ती भागात पुण्यदशमची सेवा सुरू आहे. ५० बसच्या माध्यमातून रोज सरासरी ४० हजार प्रवासी प्रवास करतात. तिकिटाचे दर कमी असल्याने प्रवाशांचा या बसला चांगला प्रतिसाद लाभतो. मात्र, वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

‘पुण्यदशम’ चा एसी का बंद :

एसी बंद ठेवण्याबाबत पीएमपी प्रशासन म्हणते

१. एसीमुळे बस गरम झाल्यावर इंजिनवर लोड येऊन बस बंद पडते

२. एसी सुरू केल्यावर इंधनाचा वापर अधिक

‘पुण्यदशम’च्या या देखील तक्रारी

१. आसन क्षमता कमी आहे.

२. आसन आरामदायक नाही

३. २० हून अधिक प्रवाशांचा उभे राहून प्रवास

‘पुण्यदशम’ बसमधील वातानुकूलित यंत्रणेत बिघाड आहे. तेव्हा प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून खिडक्या उघड्या ठेवण्यास सांगितले आहे. एसी सुरू केल्यास बस बंद पडण्याचे प्रकार घडले आहे. त्यामुळे एसी बंद ठेवले जातात.

- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी, पुणे

तीन वर्षापूर्वी पुण्यदशमची बस सुरू झाली. तेव्हापासून बसमधील एसी यंत्रणा सदोषच आहे. एसी सेवा म्हणून पीएमपी प्रशासनाने प्रवाशांची फसवणूक केली आहे.

- संजय शितोळे, पीएमपी प्रवासी मंच, पुणे