Tata Motors Tendernama
पुणे

पगारवाढ होऊनही 'टाटा मोटर्स'चे कर्मचारी का आहेत नाराज?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीचे व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यात मंगळवारी वेतनवाढ करार करण्यात आला. हा करार चार वर्षांसाठी असून, त्याद्वारे कामगारांना १६ हजार ८०० रुपयांची वाढ मिळणार आहे. या वेतन कराराचे टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी स्वगत केले आहे. तर दुसरीकडे काही कामगारांनी मात्र तीन ऐवजी चार वर्षांचा करार करण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. टाटा मोटर्समध्ये तीन वर्षांचा वेतनवाढ करार केला जातो. या वेळी मात्र चार वर्षांचा वेतनवाढीचा करार करण्यात आला असून, असा करार केला जाण्याची ही दुसरी वेळ आहे.

नव्या वेतनवाढ कारारानुसार पुढील चार वर्षांत १६ हजार ८०० रुपयांची वेतनवाढ विभागून दिली जाणार आहे. टाटा मोटर्स व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये आर्थिक वर्ष २०२२ ते २०२६ या चार वर्षांच्या कालावधीकरिता झालेल्या दीर्घकालीन वेतनविषयक करारावर व्यवस्थापन व कामगार संघटना अशा दोहोंकडून स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यानुसार कामगारांना १६ हजार ८०० रुपये वाढ मिळणार आहे. करारानंतर कामगारांनी कंपनीत जल्लोष केला.

या कार्यक्रमाला टाटा मोटर्सचे वरिष्ठ अधिकारी, युनियन पदाधिकारी, प्रतिनिधी आणि बहुसंख्येने कर्मचारी उपस्थित होते. उत्पादनक्षमतेचे मापन म्हणून ‘एचपीईव्ही’ या जागतिक परिमाणावर, गुणवत्तेचे मापन - डीआरआर आणि सक्रिय सुरक्षा मापदंड याच्यावर आधारित 'व्हेरिएबल पे' योजना जाहीर केली.

ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष ए. बी. लाल म्हणाले की, 'मी व्यवस्थापन आणि युनियन या दोन्ही कमिटीचे दीर्घकालीन वेतनविषयक करार वेळेवर आणि सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करतो. या करारामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मी पुणे प्लांटला सर्वतोपरी यश चितंतो आणि अनेक वर्षांपासून निर्माण झालेले परस्पर सहकार्य आणि विश्वासाचे संबंध दृढ करण्यासाठी दोघांनाही शुभेच्छा देतो.

युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे म्हणाले की, 'हा वेतनविषयक करार सर्वांसाठी आशादायी आहे. युनियन आणि कामगार खूप आनंदी आहेत. टाटा मोटर्सचे नेतृत्वाचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी दोघेही कठोर परिश्रमाचे योगदान सतत चालू ठेवतील.’