पुणे (Pune) : पुणे-सातारा रस्त्याचे (जुना कात्रज घाट रस्ता Pune - Satara Highway) सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावर एकेरी वाहतूक करण्यात आली असून, साताऱ्याकडून कात्रज चौकामार्गे पुणे शहरात येणाऱ्या वाहतुकीला बंदी करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत. मात्र, या आदेशाला वाहनचालकांकडून केराची टोपली दाखविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. सातारा रस्त्यावरून कात्रज चौकाकडे सर्रास वाहतूक सुरू आहे.
कात्रज घाटाजवळ खेड शिवापूर रस्ता खोदून बंद करण्यात आला असला तरी अनेकजण वाहन नवले पुलाकडे घेऊन न जाता सेवा रस्त्यावरून उलट दिशेने आणून जुन्या कात्रज घाट रस्त्यावर आणत आहेत. त्यामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हीच अवजड वाहने काम करताना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता देवेन मोरे म्हणाले, आमच्या कर्मचाऱ्यांना वाहनचालक प्रतिसाद देत नाहीत. या ठिकाणी पोलिस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून वाहतुकीचे नियोजन व्हायला हवे. याबाबत आम्ही महामार्ग पोलिस आणि पुणे वाहतूक पोलिसांशी सातत्याने संपर्क साधला आहे. मात्र, दोन्हीकडून आमच्याकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण दिले जात आहे.
यातच कंत्राटदारांकडून वाहतूक पोलिसांना नियोजनाच्या मदतीसाठी २० वॉर्डन देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सद्य:स्थितीत एकही वॉर्डन देण्यात आला नसल्याने पोलिस कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
अनेक दिवसांनंतर सातारा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. यामध्ये पोलिस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात समन्वय दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
- अभिजित सोनवणे, स्थानिक नागरिक
वाहतूक वळविण्यात आल्याने नवले पूल परिसरात शहर पोलिसांवरील ताण वाढला आहे. मात्र, तरीही आम्ही वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रयत्नशील आहोत. खेड शिवापूर परिसरात ग्रामीण पोलिसांची हद्द येते. संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तशा सूचनाही दिलेल्या आहेत.
- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, पुणे शहर