Worker Tendernama
पुणे

बांधकाम व्यावसायिकांना का भासतोय मजुरांचा तुटवडा?

टेंडरनामा ब्युरो

चाकण (Chakan) : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. उमेदवारांच्या प्रचाराला, सभेला मजुरांना रोजंदारीवर ठेऊन त्यांना दिवसाला पाचशे ते एक हजार रुपये देण्यात येत आहेत. त्यांच्याकडून प्रचार करून घेण्यावर तसेच गर्दी जमविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार सध्या भर देत आहेत.

प्रचार फेरी, सभांसाठी मजुरांची जमवाजमव, वाहनांतून त्यांची वाहतूक कार्यकर्ते या गावावरून त्या गावात व शहरात करताना दिसत आहेत. त्यामुळे मजूर शेतात, बांधकामावर मजुरी करण्यापेक्षा प्रचार रॅली, सभांमध्ये सहभागी होण्याला अधिक पसंती देत आहेत. या निवडणुकीमुळे मजुरांना काम मिळाले आहे. त्यात पैसे तसेच जेवणावळी मिळत असल्याने मजूरही आनंदात आहेत.

शेतकरी, बांधकाम व्यावसायिक व इतर प्रकारची कामे करून घेणाऱ्यांना सध्या मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत आहे.

चौकात शेकडोंच्या संख्येने बिगारी काम, शेतीचे काम करणारे मजूर महिला, पुरुष कामाच्या प्रतीक्षेत अड्डयावर, नाक्यावर उभे असतात. बांधकाम क्षेत्रात बिगारी काम करणाऱ्या पुरुष कामगारांना पाचशे ते सातशे रुपये रोज मिळतो. प्रचाराच्या, सभांच्या धामधुमीत या कामगारांना पाचशे, सातशे, आठशे, एक हजार रुपये रोज आणि सकाळचा नाश्ता, जेवण दिले जात आहे.

मजूर, बिगारी कामगारांना कोणत्या उमेदवाराचा प्रचार करायला पाठवायचे हे काही मुकादम, ठेकेदार ठरवत आहेत. मुकादम, ठेकेदाराला उमेदवारांच्या संबंधित कार्यकर्त्यांकडून रोख मोबदला देण्यात येत आहे. कार्यकर्ते एवढे मजूर आज पाठवा तेवढे पाठवा, असे मुकादम, ठेकेदाराला सांगत आहेत. मजुरांची ने-आण करण्यासाठी वाहने पाठवत आहेत, असे चित्र आहे.

सध्या मजूर, बिगारी कामगारांची दिवाळी नंतरची खरी दिवाळी सुरू आहे. सकाळी नाश्ता, उमेदवारांच्या प्रचार रॅली, दुपारी जेवण, संध्याकाळी पुन्हा प्रचार फेरी असा दिवसाचा कार्यक्रम ठरलेला आहे. महिलांना तीनशे, पाचशे रुपये देण्यात येत आहेत. यामुळे मजूर, बिगारी कामगार, काही मुकादम, ठेकेदार सध्या इतर शेतीची कामे, बांधकामे, बाजारातील कामे सोडून पूर्णवेळ राजकीय पक्षांसाठी कार्यरत आहेत.

सध्या निवडणूक सुरू असल्यामुळे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आम्हाला मागणी करतात. एरवी अड्ड्यावर, नाक्यावर तासनतास मजुरीसाठी वाट पाहावी लागते. न मागता रोजगार आता मिळत आहे. आता निवडणुकीमुळे प्रचारासाठी, सभेसाठी मुकादम ठेकेदार आम्हाला बोलावत आहेत. आमचे सध्या सुगीचे दिवस आहेत. निवडणूक संपल्यावर पुन्हा मजूर अड्ड्यावर, नाक्यावर रोजगार मिळविण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागणार आहे, असे मजुरांनी सांगितले.

भाडोत्री मजूर, बिगारी कामगार निवडणुकीतील प्रचार फेरीत, सभेसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जात असल्याने त्यांच्याकडे पक्षाची निष्ठा कशाची, असा प्रश्न निर्माण होत आहेत. मजूर, बिगारी कामगारांचा ठेकेदार, मुकादम बदलला की पक्ष बदलला जात आहे. जिकडून जास्त पैसे मिळतात, तिकडे मजूर, बिगारी कामगार पळतात. ठेकेदार मुकादमही पळतात, असे भयानक वास्तव आहे.