पुणे (Pune) : चौकाचौकात लागलेल्या आय लव्ह या विद्युत फलकांवर (I Love... Boards In Pune) महापालिकेच्या (PMC) आकाशचिन्ह विभागाने क्षेत्रीय कार्यालयांच्या मदतीने कारवाई सुरू केली आहे. दिवसभरात नऊ बोर्ड काढून टाकले आहे. मात्र, अद्याप क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी कारवाई न करण्याच्या मूडमध्ये असून, स्थानिक राजकारण्यांच्या दबावामुळे कारवाई टाळली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आय लव्ह पुणे, आय लव्ह हडपसर, आय लव्ह येरवडा, आय लव्ह बाणेर यासह ७३ ठिकाणी विद्युत बोर्ड लावण्यात आले आहेत. हे बोर्ड लावण्यासाठी २ लाख ते १० लाखांपर्यंत खर्च करण्यात आला आहे. पण हा खर्च करताना ते पादचारी मार्गावर, रस्त्यावर बोर्ड लावण्यात आले. तसेच विद्युत विभागाची परवानगी न घेता पथ दिव्यातून धोकादायक वीज पुरवठा करण्यात आला आहे. पथ विभागाचीही परवानगी घेण्यात आलेली नाही. शहरात अनेक ठिकाणी हे बोर्ड लावण्यात आल्याने विद्रूपीकरण होत असल्याने त्यावर आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
पुढील तीन दिवसांत सर्व बोर्ड निघतील, असे आयुक्तांनी सांगितले आहे. त्यानुसार गुरुवारी पहिल्या दिवशी केवळ सिंहगड रस्त्यावरील तीन आणि हडपसर येथील सहा बोर्ड काढून टाकण्यात आले आहेत. पण नगर रस्त्यावर सर्वाधिक ३३ बोर्ड असतानाही आज पहिल्या दिवशी एकही बोर्ड काढून टाकण्यात आलेला नाही. नगरसेवकांनी त्यांच्या इच्छेनुसार ज्या जागेवर अधिकाऱ्यांना बोर्ड लावायला सांगितले, आता त्याच अधिकाऱ्यांना हे बोर्ड काढण्याची वेळ आली आहे. नगरसेवकांच्या नावाचेही बोर्ड काढावे लागणार असल्याने राजकीय दबाव येत असल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले.
आज दिवसभरात हडपसर येथील ६, सिंहगड रस्ता येथील ३ विद्युत बोर्ड काढून टाकले आहेत. जे अनधिकृत बोर्ड आहेत ते सर्व काढून टाकले जाणार आहे. या कारवाईची गती वाढेल. राजकीय दबावाबाबत अद्याप तक्रार आलेली नाही. तसेच कारवाई करण्याबाबत गुरुवारी सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांसोबत चर्चा केली आहे.
- माधव जगताप, उपायुक्त, आकाश चिन्ह विभाग