Vande Bharat Tendernama
पुणे

Vande Bharat: पुण्याहून सुटणाऱ्या हुबळी अन् कोल्हापूर ‘वंदे भारत’ला कसा मिळाला प्रवाशांचा प्रतिसाद?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुण्याहून हुबळी व कोल्हापूरला सुरू झालेल्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला शनिवार व रविवार प्रवाशांचा सुमारे ७५ ते ७७ टक्के तर अन्य दिवशी ६० ते ६२ टक्के प्रतिसाद लाभत आहे. मागच्या शनिवारी हुबळीहून पुण्याला येणाऱ्या ‘वंदे भारत’ला सुमारे ९१ टक्के प्रवाशांचा प्रतिसाद लाभल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

अशा आहे स्थिती

- पुण्याहून वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होऊन हुबळी व कोल्हापूरला चार ते पाच फेऱ्या झाल्या

- पुण्याहून जाताना व पुण्याला येताना प्रवाशांचा मध्यम स्वरूपाचा प्रतिसाद लाभत आहे

- शनिवारी व रविवारी मात्र प्रवाशांच्या संख्येत वाढ

- प्रामुख्याने हुबळीहून पुण्याला येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला सर्वाधिक प्रतिसाद

केटरिंग सेवा घेण्यास तयार नाही

अनेक प्रवासी केटरिंग सेवा घेण्यास तयार नसल्याचे निदर्शनास आले आहे. मुळात अन्य रेल्वे गाड्यांच्या तुलनेत वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर अधिक आहेत. त्यात केटरिंगची सेवा घेतल्यास तिकिटांची दर आणखी वाढत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी बजेटमध्ये प्रवास करण्याला प्राधान्य देत आहे.

...तर आणखी प्रतिसाद वाढेल

पुणे-हुबळी व पुणे-कोल्हापूर या दोन ‘वंदे भारत’ची सेवा एकाच ‘रेक’च्या माध्यमातून सुरू आहे. परिणामी कोल्हापूर व हुबळीला एक दिवसाआड सेवा सुरू आहे. यामुळे पुण्याहून ज्या दिवशी ‘वंदे भारत’ सुटते त्याच दिवशी ती रेल्वे परत पुण्याला आली तर प्रवाशांचा प्रतिसाद आणखी वाढेल.

देशात पहिल्यांदाच वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा विभागून देण्यात आली आहे. पुणे-हुबळी व कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसच्या सेवेचे (ता. १६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्‍घाटन झाले होते. सुरवातीला पुणे-बेळगाव व मुंबई-कोल्हापूर अशी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसची सेवा होणार होती. मात्र ‘रेक’ची अडचण असल्याचे कारण पुढे करीत हुबळी-पुणे या सेवेत कोल्हापूर-पुणे समाविष्ट करून घेतले. त्याचा परिणाम प्रवासी सेवेवर झाला आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसच्या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. विशेषतः शनिवारी व रविवारी प्रवासी या गाडीला प्राधान्य देत आहेत. वेळेत बचत होत असल्याने प्रवासी वंदे भारताने प्रवास करीत आहेत.

- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे