Vande Bharat Tendernama
पुणे

Vande Bharat: पुण्यातील प्रवाशांवर रेल्वेकडून अन्याय का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : देशात सध्या ६८ वंदे भारत एक्स्प्रेस रोज धावत आहेत. यात एकाही गाडीची सेवा विभागून देण्यात आलेली नाही, मात्र पुणे-हुबळी व पुणे-कोल्हापूर या दोन गाड्या सेवा विभागून देण्यात आल्या आहेत. दोन शहरांसाठी दोन स्वतंत्र रेकची आवश्यकता असताना रेल्वे बोर्डाने एकाच रेकवर पुण्याची बोळवण केली आहे.

एकाच रेकच्या माध्यमातून या दोन शहरांना जोडण्यात आल्याने कोल्हापूर व हुबळीला आठवड्यातून तीनच दिवस सेवा देणे प्रशासनाला भाग पडले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. देशात वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा प्रथमच विभागून देण्यात आली आहे.

पुणे-हुबळी व कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सेवेचे सोमवारी (ता. १६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद््घाटन करण्यात आले. एकच रेक मिळाल्याने उद््घाटनापुरता एक रेक पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आला. उद््घाटन होताच हा रेक पश्चिम रेल्वेला परत देण्यात आला.

प्रारंभी पुणे-बेळगाव व मुंबई-कोल्हापूर अशी सेवा असणार होती, मात्र रेकची अडचण असल्याचे कारण पुढे करीत हुबळी-पुणे या सेवेत कोल्हापूर-पुणे समाविष्ट करून घेण्यात आले. त्याचा परिणाम प्रवासी सेवेवर होईल.

..तर प्रवास व वेळ वाढला असता

पुणे-हुबळी एक्स्प्रेस मिरज स्थानकावर पोचल्यानंतर दुसऱ्या मार्गाने कोल्हापूरला जाईल. नंतर पुन्हा कोल्हापूर ते मिरज असा प्रवास करीत हुबळीला मार्गस्थ करण्याचे रेल्वे प्रशासनाचे नियोजन होते, मात्र मिरज ते कोल्हापूर व कोल्हापूर ते मिरज अशा अतिरिक्त प्रवासामुळे ९४ किलोमीटरचा प्रवास व सुमारे दीड तासांचा वेळ वाढला असता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हे नियोजन रद्द केले.

अशी आहे विभागून सेवा :

१ . पुणे-कोल्हापूर : दर बुधवार, शुक्रवार व रविवार

कोल्हापूर-पुणे : दर गुरुवार, शनिवार व सोमवार

२. पुणे-हुबळी : दर गुरुवार, शनिवार व सोमवार

हुबळी-पुणे : दर बुधवार, शुक्रवार व रविवार

कोल्हापूरसाठी स्वतंत्र रेक असावा

गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसची प्रवाशांची मागणी आहे, मात्र यासाठी स्वतंत्र रेक उपलब्ध झालेला नाही. रेल्वे प्रशासनाने स्वतंत्र रेक उपलब्ध करून दिल्यास कोल्हापूर-मुंबई व्हाया पुणे अशी सेवा सुरू होऊ शकते. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल. पुणे-हुबळी गाडीला कराड स्थानकावर थांबा देण्यात न आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दोन शहरांना विभागून सेवा असली तरी मिरज स्थानकापर्यंत रोजच सेवा असणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही. जेव्हा आणखी एक रेक उपलब्ध होईल तेव्हा सेवेबद्दल निर्णय घेण्यात येईल.

- इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे