Pune Railway Station Tendernama
पुणे

रेल्वेच्या वेगवान प्रवासाचा नवा अध्याय; पुण्यातून धावणार वंदे भारत

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : देशातील सार्वधिक वेगवान समजल्या जाणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा वेगवान प्रवास पुण्यातून सुरु होणार आहे. घोरपडी यार्डाजवळ या एक्स्प्रेससाठी सुमारे ९० कोटी रुपये खर्चून नवा कोचिंग डेपो उभारला जाणार आहे. एकाच वेळी पाच रेकची देखभाल व दुरुस्ती करण्याची या डेपोची क्षमता असेल, असे मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

मध्य रेल्वेत या एक्स्प्रेससाठी पुणे व वाडीबंदर येथे कोचिंग डेपो उभारले जाणार आहे. यामुळे मध्य रेल्वेला किमान १० ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ मिळण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. देशातील प्रमुख रेल्वे मार्गांवर ही एक्स्प्रेस सुरु करण्याचा विचार रेल्वे बोर्डाकडून सुरु आहे. नुकतेच बोर्डाने २०० एक्स्प्रेसचा रेक तयार करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार चेन्नई येथील ‘आयसीएफ’ या कंपनीत (इंटिग्रेल कोच फॅक्टरी) हे काम सुरु झाले आहे.

ताशी १८० किलोमीटर
वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये ताशी १८० किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता आहे. तसेच तिचा कमीत कमी वेग ताशी १३० किलोमीटर आहे. पुणे ते दौंड सेक्शन १३० किलोमीटर वेगासाठी सक्षम झाले आहे. पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस ऐवजी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार हे जवळपास निश्चित आहे. तसेच पुण्याहून सुटणाऱ्या अन्य काही मार्गांवर देखील ही एक्स्प्रेस धावण्याची शक्यता आहे. यात पुणे-अहमदाबाद व पुणे-नागपूर या मार्गांचा देखील विचार सुरु झाला आहे.

तिकीट दरही जास्त असणार
वंदे भारत एक्स्प्रेसमुळे प्रवाशांचा प्रवास गतिमान होईल. शिवाय त्यांना चांगल्या सुविधा देखील मिळतील. मात्र शताब्दी, राजधानीच्या तुलनेत या एक्स्प्रेसचे तिकीट दर जवळपास ३० ते ४० टक्के जास्त असण्याची शक्यता आहे.

घोरपडी व वाडीबंदर येथे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’साठी कोचिंग डेपो बांधले जाणार आहे. आवश्यक त्या मंजुरी मिळाल्यानंतर या कामास सुरुवात होईल.
- ए. के. गुप्ता, प्रधान मुख्य यांत्रिक व्यवस्थापक, मध्य रेल्वे, मुंबई.

या एक्सप्रेसच्या एक रेकचे उत्पादन सुरु आहे. ऑगस्ट २०२३ पर्यंत ७५ रेक तयार करण्याचे उद्दिष्ट्ये आहे. कोणत्या विभागाला किती रेक दिले जाणार याचा निर्णय रेल्वे बोर्ड घेईल.
- जी. व्यंकटेशन, जनसंपर्क अधिकारी, आयसीएफ,चेन्नई.