पुणे : सिरींजचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे गुरुवारी लसीकरण मोहीम बंद ठेवण्याची महापालिकेवर वेळ आल्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने तातडीने एक लाख सिरींज खरेदी केल्या. याशिवाय आणखी सिरींज खरेदी करण्याची निविदा महापालिकेकडून काढण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी नियोजनानुसार लसीकरण सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लसीकरणासाठी ‘०.५ एमएल एडी’ या सिरींज वापरल्या जातात. केंद्राकडून राज्याला आणि राज्याकडून आरोग्य परिमंडळांना लस दिली जाते. त्यांच्याकडून ती लस जिल्हा आणि शहरांना गरजेनुसार पुरवली जाते. या लसींच्या डोसइतकेच सिरींजही दिल्या जातात. परंतु गेल्या दोन दिवसांपासून लशींच्या डोसइतक्या सिरींज मिळत नव्हत्या. बजाज कंपनीने एक लाख डोस महापालिकेला ‘सीएसआर’मधून दिले आहेत. त्यांनी सव्वा लाख सिरींजही दिल्या आहेत. त्याचा वापर सध्या झोपडपट्टींमध्ये केला जात आहे.
‘किमान पाच ते सहा लाख सिरींज खरेदी करून द्या’ असे पत्र महापालिकेच्या लसीकरण विभागाने आरोग्य प्रमुखांना दिले आहे. ही इमर्जन्सी निर्माण झाल्याने तूर्तास एक लाख सिरींजची खरेदी महापालिकेने केली आहे. उर्वरित सिरींजबाबत निविदा काढण्यात आल्याचे महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.
राज्य सरकारकडून पूर्वसूचनेशिवायच सिरींजचा पुरवठा बंद झाला. शिवाय, ही सिरींज खुल्या बाजारात उपलब्ध नाही. त्याचा परिणाम लसीकरणावर झाला.
- मुरलीधर मोहोळ, महापौर