पुणे (Pune) : कृषी महाविद्यालयाच्या वनस्पती उद्यानातील महापालिकेच्या मैलापाणी शुद्धीकरण केंद्रासाठी (एसटीपी STP) 30 गुंठे क्षेत्र हस्तांतरासाठी अधिसूचनेत आवश्यक बदल, त्यास जैवविविधता मंडळाची मान्यता घेण्याचा ठराव झाला आहे. मात्र, त्याबाबत अधिसूचनेत जैवविविधता मंडळाकडून बदल झाल्याचे पत्र, त्याविषयीचा आदेश विद्यापीठास मिळाला नसल्याचे विभागीय कृषी संशोधन केंद्राने स्पष्ट केले.
कृषी महाविद्यालयातील वनस्पती उद्यानातील जागा ‘एसटीपी’ केंद्रास मिळण्यासाठी महापालिकेकडून मागील एक ते दीड वर्षापासून प्रयत्न केले जात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष घातल्यानंतरही हा प्रश्न प्रलंबित होता.
दरम्यान, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, यांच्या सभेत ‘एसटीपी’साठी ३० गुंठे जागा हस्तांतर करण्याच्या प्रस्तावाबाबत चर्चा झाली. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत शासनाकडे शिफारस करीत आहे, असा ठराव करण्यात आला. त्याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले.
दरम्यान, सद्यःस्थितीत या क्षेत्राच्या अधिसूचनेत जैवविविधता मंडळाकडून बदल केल्याचे पत्र किंवा आदेश विद्यापीठास अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे संबंधित क्षेत्र महापालिकेस उपलब्ध करून देण्यात आले नाही, असे गणेशखिंड येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या सहयोगी संचालक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.