पुणे (Pune) : पुणे-मुंबई (Pune-Mumbai) द्रुतगती मार्गावर (Express Way) सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महामार्ग पोलिसांनी वाहतूक वळविण्याची (डायवरझन प्लॅन) योजना आखली आहे. यासाठी मार्गावर १५ ठिकाणाची निवड केली आहे. अपघात होणारे तसेच वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणापासून काही अंतरावरच यासाठीचे पॅचेस तयार केले आहे. तिथून वाहतूक वळविल्यास मार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही. जवळपास १५ पॅचेसच्या माध्यमातून वाहतूक कोंडी सोडविण्याचे प्रयत्न आहेत.
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर रोज पन्नास ते साठ हजार वाहनांची वाहतूक होते. शनिवारी व रविवारी वाहनांच्या संख्या आणखी वाढते. यातच जर अपघात झाला तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. पाच-पाच किमी वाहनांच्या रांगा लागतात. यावेळी वाहतूक सुरळीत करणे हेच सर्वांत मोठे आव्हान असते. यासाठी महामार्ग पोलिसांनी द्रुतगती मार्गावरची वाहतूक वळवून जुन्या महामार्गावर आणणे, काही ठिकाणी यु टर्न देऊन वाहतूक वळविणे आदी स्वरूपाची योजना अमलात आणली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही असा विश्वास महामार्ग पोलिसांना आहे.
काय आहे डायवरझन प्लॅन?
पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महामार्ग पोलिसांनी पुणे-मुंबई, मुंबई-पुणे व जर दोन्ही लेन जाम झाले तर काय? असा विचार करून डायवरझन प्लॅन तयार केला. यात दोन्ही बाजूचे १५ पॅचेस तयार केले. हे पॅचेस करताना वाहतूक काही वेळेपुरते जुन्या महामार्गावर येते. त्यानंतर पुन्हा ठरलेल्या ठिकाणावरून पुन्हा द्रुतगती मार्गावर येते. हे प्लॅन तयार करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी १० ते २० दिवस या मार्गाचा सर्व्हे केला. शिवाय मनुष्यबळ कमी असताना देखील ही योजना अधिक यशस्वी करण्यासाठी बारकाईने नियोजन केले.
हे आहेत पॅचेस
पॅचेसचे चार प्रमुख गटात विभागणी केली आहे. यात वडगाव, खंडाळा, बोरघाट, व पळस्पे यांचा समावेश आहे. वडगावच्या हद्दीत ५, खंडाळाच्या हद्दीत ३, बोरघाटच्या ३ व पळस्पेच्या हद्दीत ४ ठिकाणांचा समावेश करण्यात आला. या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्यास वाहतूक वळविली जाईल.
वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी आम्ही डायवरझन प्लॅन तयार केला. त्याची आम्ही अंमलबजावणी देखील सुरू केली आहे. प्लॅन करण्यापूर्वी ड्रोन कॅमेरापासून ते रडारचा वापर केला. प्रत्यक्ष पाहणी देखील केली. जवळपास १० ते १५ दिवस याचा अभ्यास केला. डायवरझन प्लॅनमुळे नक्कीच वाहतूक कोंडी सुटेल.
- प्रीतम यावलकर, उपअधीक्षक, महामार्ग पोलिस, पुणे