पुणे (Pune) : चांदणी चौकात (Chandani Chowk) सुरू असलेल्या बहुमजली उड्डाण पूल व रस्त्याच्या कामामुळे मुंबई-बंगळुरू (Mumbai-Bangalore) महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. सकाळी पुण्यातून मुंबईच्या दिशेने जाताना, तर सायंकाळी मुंबईहून पुण्याच्या दिशेने येताना ही वाहतुक कोंडी होत आहे. त्यात दररोज या मार्गावरून प्रवास करणारे लाखो प्रवासी वाहनांच्या एक ते दोन किलोमीटरपर्यंत लागणाऱ्या रांगेत अडकून पडत आहेत. विशेषतः शनिवार व रविवारच्या सुट्यांमुळे शुक्रवारपासूनच मोठ्या या परिसरात वाहतूक कोंडी होऊनही ती सुरळीत करण्यासाठी ठोस प्रयत्न होत नसल्याची सद्यःस्थिती आहे. तासनतास होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका वृद्ध, लहान मुले व महिलांना बसत आहे; मात्र हा प्रश्न मांडणार कुठे, असा प्रश्न त्यांना पडत आहे.
‘‘सूस येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला निघालो आहे. समवेत पत्नी दोन लहान मुले व मित्र आहेत. महामार्गावरील वाहतूक कोंडीत आमचीही मोटार अडकली. तब्बल एक ते दीड तास पाषाण तलाव ते चांदणी चौकापर्यंत वेळ लागला. मुले भुकेने अक्षरशः व्याकूळ होऊन रडत होती, हा अनुभव आहे मोटारचालक विश्वनाथ बावडेकर यांचा ! कारण अर्थातच, चांदणी चौकातील वाहतूक कोंडी!
...म्हणून होतेय कोंडी
चांदणी चौकातील उड्डाण पूल व रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मात्र बावधन, मुळशीकडून येणारी वाहने चांदणी चौकाजवळील जुन्या पेट्रोल पंपाजवळून पुन्हा महामार्गाला मिळत असल्याने कोंडीत अधिकच भर पडत आहे. दररोज सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू होणारी वाहतूक कोंडी रात्री दहा वाजेपर्यंत कायम असते. कॉफी कॅफे डेसमोर पिंपरी-चिंचवडचे काही वाहतूक पोलिस व वॉर्डन दिसतात. ते पाषाणकडून येणाऱ्या वाहतुकीला मार्ग मोकळा करून देतात; मात्र महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याची सद्यःस्थिती आहे.
तात्पुरत्या उपाययोजना
- काही ठिकाणी ‘फिरते सिग्नल’ ठेवून महामार्गावरील वाहतुकीला सर्वाधिक वेळ देणे
- पाषाण रस्त्यावरील वाहतूक काही मिनिटे थांबवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवणे
- पोलिस अधिकारी व अधिकाधिक कर्मचारी नियमनासाठी ठेवणे
- सलग सुट्यांच्यावेळी महामार्गावर अधिक पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे
मुंबईहून प्रवासी घेऊन सहा वाजता सूस खिंडीजवळ येतो. मात्र पाषाण तलावापासून वाहतुक कोंडीत अडकल्यानंतर चांदणी चौक ओलांडण्यासाठी दीड तासाचा वेळ जातो. महामार्ग असूनही वाहतूक नियमनाबाबत गांभीर्य नाही. वाहतूक पोलिस, महामार्ग पोलिसांकडून कुठलीच उपायोजना केली जात नाही.
- अजय रजपूत, वाहनचालक