पुणे (Pune) : Vande Bharat Express वंदे भारत एक्स्प्रेसला एक-दोन मिनिटांचादेखील उशीर होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाला वेळेची चांगलीच कसरत करावी लागत आहे. पुणे विभागाने पुणे स्थानकावरून (Pune Railway Station) धावणाऱ्या सुमारे ३५ रेल्वेच्या वेळेत बदल केला आहे. यात मेल एक्स्प्रेससह लोकलच्या वेळादेखील बदलण्यात आले आहे.
पुणेसह मुंबई व सोलापूर विभागदेखील ‘वंदे भारत’चा वेग कायम ठेवण्यासाठी आपापल्या स्तरांवर प्रयत्न करीत आहे, अशी माहिती पुणे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ. स्वप्नील नीला यांनी दिली.
मुंबई - सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा १० फेब्रुवारीपासून सुरू झाली. पुणे विभागाने त्याच्या आधीच तयारी केली होती. पुणे रेल्वे प्रशासनाने सुमारे ३५ रेल्वेची वेळ बदलली आहे.
बदलण्यात आलेली वेळ ही पूर्वीच्या वेळेच्या तुलनेत पाच ते दहा मिनिटांची वेळ आधीची केली आहे. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड ते लोणावळा दरम्यान धावण्यासाठी ट्रॅक सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेनुसार धावत असल्याचे डॉ. नीला यांनी नमूद केले.
लोकल पुण्याहून सोडावी, कर्मचाऱ्यांची मागणी
पुणे स्थानकावरचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी पुण्याहून सुटणाऱ्या पाच लोकलचे स्थानक बदलले आहे. पुणे ऐवजी शिवाजीनगर स्थानकावरून पाच लोकलच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. परिणामी पुणे स्थानक परिसरात असलेल्या विविध शासकीय कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे.
कर्मचाऱ्यांना शिवाजीनगर येथूनच प्रवास सुरू व संपवावा लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत आहे. तेव्हा सायंकाळची लोकल पुन्हा पुणे स्थानकावरून सोडण्यात यावी, अशी प्रवाशांतून मागणी होत आहे.
पुणे स्थानकावरून लोकलने प्रवास करणाऱ्याची संख्या अधिक आहे. शिवाजीनगर स्थानकावरून लोकल सेवा सुरू झाल्याने अनेक शासकीय कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. कार्यालयात शिवाजीनगर स्थानकावर जाण्यासाठी किमान २० ते ३० मिनिटांचा अपव्यय होत आहे.
- डॉ. सोमनाथ सलगर, ससून हॉस्पिटल, पुणे