Pune Railway Station Tendernama
पुणे

Pune रेल्वे स्थानकावरील पार्किंग ठेकेदाराचे टेंडर रद्द होणार, कारण

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : रेल्वे स्थानकावरील (Pune Railway Station) पार्किंग चालकांबद्दल (Parking Contractor) वारंवार तक्रारी आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्याला एकूण १ लाख १० हजार रुपयांचा दंड केला आहे.

शिवाय त्याचे टेंडर रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या संबंधीची ठेकेदारास नोटीस देखील दिली जाणार आहे. रेल्वे प्रशासनाकडे आतापर्यंत या पार्किंग चालकाविषयी सुमारे १० ते १२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या नंतर वाणिज्य विभागाने कडक भूमिका घेऊन कारवाई करण्यास सुरवात केली आहे.

पुणे स्थानकावरील प्रिमियम पार्किंगचा ठेका के. पद्मजा यांना देण्यात आला. प्रवाशांकडून जास्तीचे पैसे आकारणे, प्रवाशांशी उद्धट भाषेत बोलणे, गणवेश परिधान न करणे आदींविषयी रेल्वेला प्रवाशांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या.

रेल्वेने या पूर्वी ६० हजार रुपयांचा दंड आकाराला, तर नुकत्याच प्राप्त झालेल्या तक्रारींवरून आणखी ५० हजार रुपयांचा दंड आकारला आहे. तक्रारींचे वाढते स्वरूप लक्षात घेऊन वाणिज्य विभागाने त्याचे टेंडरच रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तत्पूर्वी संबंधित ठेकेदारास दोन दिवसांत नोटीस दिली जाणार आहे.

सद्यःस्थिती
रोज सुमारे ९०० गाड्या पार्किंगमध्ये
दुचाकी : १० रुपये (पहिल्या दोन तासांसाठी )
चारचाकी : २० रुपये (पहिल्या दोन तासांसाठी)
क्षेत्रफळ : ३१२५ चौरस मीटर

पार्किंगच्या ठेकेदाराविरोधात प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. टेंडर रद्द करण्याविषयी आम्ही विचार करीत आहोत.
- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे