Traffic  Tendernama
पुणे

पुण्याच्या कारभाऱ्यांना सुबुद्धी! ...पण कोंडी फूटणार का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरातील वाहतूक कोंडीमुळे (Traffic Problem In Pune City) नागरिक हैरण झालेले असताना अखेर महापालिका (PMC) आणि पोलिसांनी (Police) एकमेकांकडे बोट दाखविण्याऐवजी समन्वयातून कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच पहिला टप्पा म्हणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नुकतीच गणेश खिंड रस्ता, चांदणी चौक, सिंहगड रस्‍त्यावरील उड्डाणपूल, मेट्रोच्या कामाची पाहणी केली. उड्डाणपुलाचे ठेकेदार काम नसतानाही विनाकारण बॅरिकेडींग करून रस्ता अडवत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, असे आदेश या दोन्ही आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत.

गणेश खिंड रस्ता, बाणेर रस्त्यावरील मेट्रोचे काम, चांदणी चौकातील उड्डाणपूल, नवले पूल येथील अपघात प्रवण क्षेत्र, तसेच सिंहगड रस्त्यावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी व वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या उपाय योजना यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पाहणी केली. वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, महापालिकेचे मुख्य प्रकल्प अभियंता श्रीनिवास बोनाला, पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप आदी यावेळी उपस्थित होते.

गणेशखिंड रस्त्यावर पाहणी करताना वाहतुकीत बदल करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. जवाहरनगर येथील यूटर्न पुढील काही दिवसात बंद करून टाकला जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठ चौकाकडून सेनापती बापट रस्त्याकडे जाण्यासाठी नागरिकांनी शेतकी महाविद्यालय येथील उड्डाणपुलाखालून वळसा घालून परत जावे लागणार आहे. तसेच मॉडर्न महाविद्यालयाच्या मैदानातूनही ९ मीटरचा रस्ता करण्यासाठी लवकर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याच प्रमाणे बाणेर, चांदणी चौकातील कामाची पाहणी केली. चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम हे मुदतीपूर्वी पूर्ण केले जाणार असल्याचे एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नवले पुलाच्या परिसरात वारंवार अपघात होतात, येथे एनएचएआयतर्फे अनेक उपाय योजना केल्या आहेत. त्याची पाहणी करण्यात आली. सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, या ठिकाणी नागरिकांना कोणताही त्रास नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या दोन्ही आयुक्तांचा कात्रज कोंढवा रस्ता, हडपसर भागातील वाहतूक कोंडीची पाहणी झालेली नाही, पुढील बैठकांमुळे हा दौरा अटोपता घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठेकेदारांना नोटिसा

गणेश खिंड रस्ता, सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. पण ज्या ठिकाणी काम बंद आहे अशा ठिकाणी बॅरिकेडींग करू नयेत, अशा सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. पण त्याकडे ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून हे बॅरिकेडींग करून किती दिवसांपासून रस्ता अडवला व कोंडिला हातभार लावला आहे हे तपासण्यास सांगितले आहे.

दौऱ्यामुळे अतिक्रमण गायब, वॉर्डन चौकात

सिंहगड रस्त्यावर माणिकबाग, संतोष हॉल चौक, गोलय गंगा भागात रोड वाहतूक कोंडी असते, अतिक्रमणांमुळे रस्ता अरुंद झालेला असतो. पण त्याकडे महापालिका व वाहतूक पोलिस दुर्लक्ष करतात. पण महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्त पाहणीसाठी येणार असल्याने रस्त्यावरील अतिक्रमण काढले होते. चौकांमध्ये वॉर्डन उभे होते, त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होती. याचा सुखद अनुभव नागरिकांनी घेतला.