पुणे (Pune) : पुणे महापालिकेच्या (PMC) महत्त्वाकांक्षी मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या प्रयोगिक तत्त्वावर येरवडा येथे सुरू असलेल्या टप्प्याचे काम जानेवारी महिन्यात होणाऱ्या ‘जी २०’ परिषद आणि ‘नदी उत्सव’ या परिषदेपूर्वी पूर्ण करण्याचा आदेश ठेकेदाराला देण्यात आला आहे. हा टप्पा पूर्ण झाल्याने नागरिकांना प्रकल्पाची व्यवस्थित माहिती मिळेलच, शिवाय गैरसमज दूर होतील, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
२०२३ मध्ये होणाऱ्या ‘जी २०’ परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. पुढील वर्षभरात देशातील विविध शहरांत बैठका होणार आहेत. त्यात पुण्यात तीन बैठकांचा समावेश आहे. त्या दृष्टीने महापालिकेकडून तयारीला वेग आला आहे. या परिषदेतील पुण्यातील पहिली बैठक १३ ते १५ जानेवारी, १६ ते १८ जून व २८ व २९ जून या कालावधीत होणार आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन आढावा घेतला.
बैठकीच्या निमित्ताने पुण्यातील सार्वजनिक स्वच्छतेवर भर दिला जात आहे. यात होर्डिंग, अनधिकृत फ्लेक्स, अतिक्रमण यावर कारवाई करण्यावर भर दिला जात आहे. तसेच प्रमुख ६० चौकांचे सुशोभीकरण केले जाणार असून, ५२ ठिकाणचे काम सुरू झाले आहे. शहरातील मोठ्या कंपन्या व उद्योगपती, बँकांनीही शहराच्या सुशोभीकरणाला हातभार लावावा, यासाठी येत्या आठवड्यात त्यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे. दोन मोठ्या बैठका शहरात होत असल्याने नदी सुधार प्रकल्पाचा सुमारे ३०० ते ५०० मीटरचा टप्पा जानेवारी महिन्यात पूर्ण करा, असा आदेश देण्यात आलेला आहे, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.
‘जी २०’ परिषदेसाठी तयारी करताना विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यावरील पंचतारांकित हॉटेलपर्यंतच्या मार्गांची आयुक्तांकडून पाहणी केली जाणार आहे. या रस्त्यावरून देश-परदेशातील उच्च पदस्थ अधिकारी जाणार असल्याने पथदिवे, अतिक्रमण, रस्ते, राडारोडा यासह इतर पायाभूत सुविधा, सुशोभीकरणाचा आढावा घेतला जाईल. त्यातून आवश्यक त्या ठिकाणी लगेच सुधारणा केल्या जातील.