पुणे (Pune) : ग्रामीण भागातील रस्त्यांना नवसंजिवनी देणाऱ्या मुख्यमंत्री रस्ते विकास योजनेचा (CM Road Development Scheme) दुसरा टप्पा सुरू करण्यास मंजुरी मिळाल्याने या संदर्भात निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत राज्यात वर्षभरात ७ हजार किलोमीटर लांबीच्या नव्या रस्त्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री रस्ते विकास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यात ३८५ किलोमीटर लांबीचे नवे रस्ते केले जाणार आहेत. येत्या वर्षभरात पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची एकूण लांबी १२ बारा हजार किलोमीटरचा टप्पा ओलांडणार आहेत. देशातील गावे, वाड्या-वस्त्या रस्त्यांनी जोडण्यासाठी केंद्र सरकारने १९९९मध्ये पंतप्रधान रस्ते विकास योजना सुरू केली होती.
या योजनेंतर्गत किमान पाचशे लोकसंख्या असलेली गावे आणि वाड्या-वस्त्या या पक्क्या रस्त्यांनी जोडण्याचे धोरण केंद्र सरकारने जाहीर केले होते. राज्यात एकूण दहा टप्प्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यानंतर ही योजना बंद झाली. त्यामुळे पंतप्रधान रस्ते विकास योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री रस्ते विकास योजना सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता.
यानुसार त्यांनी या योजनेच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी केली होती. मात्र २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाले आणि महायुतीचे सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. या सत्तांतरामुळे मुख्यमंत्री रस्ते विकास योजना पुढे चालू राहणार की नाही याबाबत पंचायतराज संस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम राज्य सरकारच्या ताज्या निर्णयाने दूर झाला आहे.