Pune Tendernama
पुणे

Pune: हुश्श्य...कात्रज-कोंढवा रोडचा प्रश्न मार्गी लागणार, कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : भूसंपादनामुळे रखडलेला आणि मृत्यूचा सापळा झालेल्या कात्रज-कोंढवा रस्ता (Katraj - Kondhwa Road) रुंदीकरणाचा प्रश्‍न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा रस्ता रुंद करण्यासाठी राज्य सरकारने अखेर २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे ५० मीटर रस्ता रुंदीकरण करताना त्यामधील मिळकतधारकांना रोख नुकसान भरपाई देऊन रखडलेले काम मार्गी लावता येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निधी मंजुरीची माहिती दिली.

दक्षिण पुण्यातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. सध्या हा रस्ता ३२ मीटरचा असला तरी तो अपुरा आहे, त्यामुळे महापालिकेने मोठा गाजावाजा करून ८४ मीटरपर्यंत रुंदीकरणाचा निर्णय घेतला.

या चार किलोमीटरच्या रस्त्यासाठी दोन लाख ८८ हजार चौरस मीटर जागा आवश्‍यक आहे. त्यापैकी ५८ हजार चौरस मीटर जागेवर रस्ता आहे. तर ६६ हजार चौरस मीटर जागा ताब्यात आली आहे. आणखी एक लाख २८ हजार चौरस मीटर जागेचे भूसंपादन आवश्‍यक असल्याने प्रकल्पाचे काम ठप्प आहे.

जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका रोख रकमेऐवजी टीडीआरच्या माध्यमातून मोबदला देण्यास तयार आहे. पण सध्या टीडीआरचे दर पडलेले असल्याने जागा मालक टीडीआर घेण्यास तयार नाहीत. सर्वच जागा रोख रकमेने ताब्यात घेतल्यास त्यासाठी ८१५ कोटी रुपये खर्च येणार असल्याने महापालिकेने रोखीने मदत करण्यास नकार देत टीडीआर, क्रेडीट नोटचा पर्याय दिला. पण तो परवडणारा नसल्याने जागा मालकांनी जमीन ताब्यात दिलेल्या नाहीत.

रस्ता ५० मीटर रुंदीचा निर्णय
महापालिकेच्या ‘डीपीआर’नुसार कात्रज-कोंढवा रस्ता ८४ मीटर रुंद केला जाणार होता. मात्र, जानेवारी २०२३ मध्ये महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या रस्त्याची पाहणी करून पहिल्या टप्प्यात मुख्य रस्ता रुंद करण्यासाठी ८४ ऐवजी ५० मीटर रुंदीचे काम करण्याचा निर्णय घेतला. यामुळे भूसंपादनाचा खर्च २८० कोटी रुपये इतका येणार होता. यापैकी २०० कोटी रुपये सरकारकडून घेतले जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. महापालिकेने यासंदर्भातील प्रस्ताव सरकारकडे पाठविला होता.

चांदणी चौकाच्या धर्तीवर मदत
‘एनएचएआय’ने चांदणी चौकात सुमारे ४०० कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल उभारला आहे. त्यामध्ये भूसंपादनाचा सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च महापालिकेस करावा लागणार होता. हा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला. त्याच धर्तीवर कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने मदत करावी, यासाठी प्रस्ताव पाठवला होता. त्यास मंजुरी दिली आहे. पुणे महापालिकेला ८० कोटी रुपये भूसंपादनासाठी द्यावे लागणार आहेत.

महापालिकेला निधीची प्रतिक्षा
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी २०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत, असे स्पष्ट केले असले तरी हा निधी अद्याप महापालिकेला मिळाला नाही. यासंदर्भात राज्य सरकारकडून आदेश काढल्यानंतर मे महिना अखेरपर्यंत हा निधी जमा होणे अपेक्षीत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

असे होणार काम
३.५ किमी - रस्त्याची लांबी

५० मीटर - रस्ता रुंदीकरण

३६ मीटर - मुख्य रस्ता

७.५ मीटर - दोन्ही बाजूला सर्व्हिस रस्ता

२८ टक्के - आतापर्यंत काम पूर्ण

राज्य सरकारने पुण्यातील प्रकल्पांसाठी ११०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे, त्यामध्ये पहिल्या टप्प्यात कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २०० कोटी रुपये दिले आहेत. भविष्यात या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासणार नाही.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री