पुणे (Pune) : महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती - Mahajyoti) इतर मागासवर्गीय आणि अन्य विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी काढलेल्या टेंडरमध्ये (Tender) गैरव्यवहार झाला असून, या प्रकरणाची विशेष समिती स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी वारंवार होत आहे. (Tender Scam News)
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे पत्र आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी बहुजन कल्याण विभागाचे सचिवांना पाठविले आहे.
महाज्योती संस्थेने प्रसिद्ध केलेल्या टेंडरबाबत झालेला गैरकारभार आणि तसेच महाज्योती संस्थेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याने केलेल्या गैरकारभाराबाबत चौकशी करण्याची आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीतर्फे राज्य समन्वयक रमेश पाटील यांनी केली आहे.
शासनाची फसवणूक करणाऱ्या महाज्योतीमधील व्यक्तींवर कठोर कार्यवाही करावी, तसेच क्लासकडून तसेच दोषींकडून टेंडरची रक्कम वसूल करावी, तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी समितीने केली आहे.
या अनुषंगाने समितीकडून संबंधित व्यक्तीवर कार्यवाही करण्याबाबत वारंवार पाठपुरावा केला जात आहे. हा विषय बहुजन कल्याण विभागाच्या अधिनस्त असल्याने प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे पत्र डॉ. भारूड यांनी बहुजन कल्याण विभागाच्या सचिवांना पाठविले आहे.