पुणे (Pune) : राज्य परिवहन महामंडळाचा प्रवास आता ‘एलएनजी’वर होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी कतार येथील किंग ११ गॅस कंपनीसोबत करार झाला. पहिल्या टप्यात राज्यातील ९० आगारांत ‘एलएनजी’चे पंप बांधण्यात येणार आहेत. यात पुणे विभागातील इंदापूर आगाराचा समावेश आहे. येत्या दोन महिन्यांत पंपाची निर्मिती होईल. त्यानंतर ‘एलएनजी’मध्ये रूपांतर झालेल्या एसटींपैकी सुमारे ६० एसटी बस पुणे विभागात धावणार आहेत. यामुळे इंधनावर होणाऱ्या खर्चात बचत होईल.
डिझेलवर राज्य परिवहन महामंडळाचा दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. त्यामुळे एसटी प्रशासनाने मागील काही वर्षात ई-बससह, सीएनजीवर गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काही बस सीएनजीवर, तर काही ई-बस धावत आहेत. आता पहिल्यादांच एसटी ‘एलएनजी’वर धावणार आहे.
सहा महिने लागणार
राज्यातील विविध आगारांत ‘एलएनजी’चे ९० पंप बांधले जाणार आहेत. हा टप्पा पूर्ण झाल्यावर सहा टप्यांत डिझेल एसटीचे ‘एलएनजी’मध्ये रूपांतर केले जाईल. यामुळे एसटीच्या खर्चात बचत होणार आहे. इंदापुरात एलएनजीवर एसटी धावण्यास किमान सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
एका बसचा खर्च १९ लाख
एका डिझेल बसचा ‘एलएनजी’मध्ये रूपांतरित करण्याचा खर्च सुमारे १९ लाख इतका आहे. हा खर्च राज्य सरकार स्वतः करणार आहे. पंप बांधण्याचा खर्च कंपनी करणार आहे. पुणे विभागात केवळ इंदापूर आगारात हा पंप बांधण्यात येणार आहे. यासाठी मोठी जागा लागते. शिवाय अन्य काही तांत्रिक कारणांमुळे स्वारगेटसारख्या महत्त्वाच्या आगारात ही सुविधा उपलब्ध नसेल.
वर्षाला २३४ कोटी रुपयांची बचत
-‘एलएनजी’च्या वापरामुळे प्रदूषण होणार नाही
-डिझेलच्या तुलनेत ‘एलएनजी’चे दर किमान सात रुपयांनी कमी आहे
-महामंडळाची दरवर्षी २३४ कोटी रुपयांची बचत होणार
-डिझेलच्या एक लिटरमध्ये एसटी चार ते साडेचार किलोमीटर धावते
-‘एलएनजी’वर एसटी प्रतिकिलो ५.५ किलोमीटर धावेल
-एसटी प्रशासनाला मोठा फायदा होईल.
इंदापूर आगारात पहिला ‘एलएनजी’ पंप बांधण्यात येणार आहे. हा विभागातला पहिला पंप असेल. मात्र, यासाठी आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे.
- प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, पुणे
७०० - पुणे विभागातील एसटी बस
२०० - सीएनजी बस
१५० - ई-बस
३५० - डिझेलवरील बस
६० - ‘एलएनजी’वर रुपांतरीत होणाऱ्या बस
९० - राज्यात उभारले जाणारे ‘एलएनजी’ पंप
६ - टप्प्यांत बसचे रूपांतर होणार
‘सीएनजी’चा वापर होणारे आगार
बारामती
सासवड
शिरूर
राजगुरुनगर
ई-बसचे आगार
स्वारगेट
शिवाजीनगर
मंचर
बारामती
इंदापूर