पुणे (Pune) : खराडी बायपास चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेकडून उड्डाणपूल व भुयारी मार्गाचा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पण हा उड्डाणपूल करताना या चौकात या प्रकल्पाची गरज आहे का, असल्यास उड्डाणपूल कसा झाला पाहिजे, यासाठी वाहतुकीचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासाठी स्पेनमधील ब्लूस्काय या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या शेवटी हा अभ्यास केला जाणार आहे. (Pune Municipal Corporation)
पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल, भुयारी मार्ग उभारले जात आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून हे उड्डाणपूल बांधले तरी त्यात त्रुटी राहत असून नव्याने काही समस्या निर्माण होत आहेत. यापार्श्वभुमीवर महापालिकेने खराडी-मुंढवा या रस्त्यावर उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग प्रस्तावीत केला आहे. त्याचा डीपीआर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाचा कच्चा आराखडा मेट्रोच्या मंजुरीसाठीही पाठविण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत या प्रकल्पाचे टेंडर काढले जाणार आहे, असे सांगितले जात असताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या चौकात स्पेनमधील कंपनीकडून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.
असा होणार अभ्यास
ब्लूस्काय या कंपनीकडून खराडी बायपास चौकाचा अभ्यास केला जाणार आहे. यामध्ये फिनिक्स मॉल, टाटागार्ड रूम आणि खराडी चौक येथे हे कॅमेरे लावले जाणार आहेत. सलग सात दिवस या रस्त्यावर सर्व बाजूने येणारी वाहतूक, पादचारी यांचे निरीक्षण केले जाईल. त्यानुसार त्याचा अहवाल तयार करून तो महापालिकेला सादर केला जाणार आहे.
खराडी चौकातील उड्डाणपुलाचा डीपीआर तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. पण या ठिकाणी पुलाची गरज आहे का? असेल तर कोणत्या बाजूला पूल असला पाहिजे, कोणत्या भागातून वाहतूक जास्त आहे याचा अभ्यास करण्यासाठी स्पेनमधील ब्लूस्काय ही कंपनी नियुक्त केली आहे. सात दिवस या चौकात वाहतुकीचे निरीक्षण केले जाणार आहे.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महानगरपालिका