पुणे (Pune) : सिंहगड रस्ता (Sinhagad Road) भागातील नागरिकांना राजाराम पूल (Rajaram Bridge) चौकाजवळ दररोज वाहतूक कोंडीचा (Traffic) सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे इंधन आणि वेळ दोन्ही वाया जात असल्याने त्यांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते.
त्यामुळे प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या केंद्रस्थानी सामान्य नागरिक नसून, आमच्या नशिबी वाहतूक कोंडीच, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. तसेच या प्रश्नावर प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सिंहगड रस्ता भागात उड्डाणपूल झाला, तरी नागरिकांची कोंडीतून सुटका काही झाली नाही. राजाराम पूल चौकात सकाळी धायरीकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या दिशेला, तर सायंकाळी स्वारगेटकडून धायरीकडे जाणाऱ्या दिशेला वाहनांची कोंडी होत आहे.
विठ्ठलवाडीकडून राजाराम पुलाकडे जाताना नवीन सुरू झालेल्या गृह संकुलातील दुकानांमुळे या कोंडीत भर पडत आहे. या गृहसंकुलात अद्याप एक दालन सुरू झाले असून दुसरेही लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे. या दालनांच्या उद्घाटनावेळी येथील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती.
या दालनाच्या उजव्या बाजूला पुलाचा प्रवेश आणि पूल आहे, तर डाव्या बाजूला पालिका पाणी शुद्धीकरण केंद्राजवळ रस्त्याचे काम सुरू आहे. त्याच बाजूला सध्या या दालनांमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावरच पार्क केली जात असल्याने कोंडीची समस्या वाढली आहे.
सायंकाळी व रात्रीच्या वेळी राजाराम पूल व विठ्ठलवाडी अशी विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक बंद करण्यात यावी. तसेच सिंहगड रस्त्यावरील अतिक्रमणांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
या ठिकाणी सुरू झालेल्या दालनांसाठी आरक्षित पार्किंग व्यवस्था इमारतीच्या सीमा भिंतीच्या आत असावी. त्याला लागून असलेल्या पदपथ अथवा रस्त्यावर ग्राहकांनी वाहने लावू नये. तसेच त्यांना मोफत पार्किंगची व्यवस्था द्यावी म्हणजे बाहेरच्या रस्त्यावर वाहने उभी करण्याची वेळ ग्राहकांवर येणार नाही.
- सचिन देशमुख, नागरिक
वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी नो-पार्किंगचा फलक लावण्यात यावा. विठ्ठलवाडी कमान ते राजाराम पूलादरम्यान वाहने लावण्यास बंदी घालण्यात यावी. तसेच येथील व्यावसायिकांनी आपल्या ग्राहकांसाठी वाहनतळाची व्यवस्था करावी.
- अभिषेक पाटील, नागरिक