पुणे (Pune) : सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) नांदेड फाटा ते खडकवासला दरम्यान पाऊस पडल्यानंतर ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला पावसाचे पाणी साचत आहे. पाणी निचरा होण्यासाठी पावसाळी गटार नसल्याने ही समस्या उद्भवत आहे. साचलेल्या पाण्यामुळे व्यावसायिक, वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
खडकवासला ते नांदेड फाटा हा रस्ता संपूर्ण सिमेंट कॉंक्रिटचा झालेला आहे. सिमेंटचे रस्ते बनविताना दोन्ही बाजूने पावसाळी गटारे करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पावसाचे व दूषित पाणी रस्त्याच्या साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना रस्त्याचा अंदाज येत नाही.
जाधवनगर व नांदेड फाटा भागात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी साचले आहे. सिंहगड रस्त्यावर राष्ट्रीय जल अकादमीचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराजवळच मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असते. या रस्त्यावर पानशेत डोणजे भागातून नागरिक, विद्यार्थी व शेतकरी मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत असतात. साचलेल्या पाण्यातून महाविद्यालयीन विद्यार्थी, सायकल चालक, शेतकरी, व्यापाऱ्यांना वाट काढावी लागते. या रस्त्यावर पावसाळी गटार नसल्याने सर्व पाणी रस्त्यावर येते. थोडा पाऊस पडला तरी रस्त्यावर पाणी साचते.
साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. येथे अनेक दुकानदारांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. रस्त्याचे काम एका पातळीत न झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचत आहे. रस्ता रुंदीकरण करताना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी गटाराचे काम करणे गरजेचे होते. ते ठेकेदाराने न केल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थीही बस थांब्यावर थांबलेले असतात. अनेकदा मोठ्या गाड्या पाण्यातून गेल्यानंतर घाण पाणी प्रवाशांच्या अंगावर उडते. महापालिकेने येथे पाणी निचऱ्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी व्यावसायिक व नागरिक करत आहेत.
रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने त्यातून जावे कसे असा प्रश्न पडतो. रस्त्याच्या कडेने पायी गेले तरी वाहने जोरात जात असल्याने अंगावर घाण पाण्याचे शिंतोडे उडतात, त्यातून थेट कपडे माखन्याचे प्रकार घडले आहेत. दुकानांसमोर पाणी साचल्याने अनेकदा ग्राहक येण्यास धजावत नाही. महापालिकेने याप्रश्नी कायमचा तोडगा काढावा.
- नरेंद्र हगवणे, माजी उपसरपंच, किरकटवाडी
देखभाल दुरुस्तीचे काम ठेकेदार रोडवेज सोल्यूशन कंपनीचे आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सतत रस्ता दुरुस्तीबाबत सांगत असतो. परंतु याकडे ठेकेदार पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. तसेच आमच्या स्तरावर या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करून घेणार आहोत.
- ज्ञानेश्वर राठोड, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग