पुणे (Pune) : पुणे शहरात पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलावर शेवटचा डांबरीकरणाचा थर अद्याप मारण्यात आलेला नाही. प्रशासनाने जागेवर जाऊन पाहणी केली. त्यामध्ये उड्डाणपुलावर ओलावा असल्याने हा थर मारता येणार नसल्याने नियोजन रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, हा पूल खुला करण्यासाठी राजकीय पक्षांचा दबाव वाढत असल्याने उद्घाटनाचे कवित्व सुरू झाले आहे.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राजाराम पूल ते फन टाइम थिएटरदरम्यान उड्डाण पूल बांधला जात आहे. मुख्य उड्डाण पुलाचे काम असून सुरू असले, तरी राजाराम पूल चौकातील उड्डाण पुलाची लांबी कमी असल्याने हे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आले.
पण १४० मीटर लांबीच्या उड्डाणपुलावर स्वारगेटच्या दिशेने उतरणाऱ्या रॅम्पवर शेवटचा ५० मिमीचा डांबराचा थर मारण्याचे काम पावसामुळे करता आले नाही. हे काम महिनाभरापासून खोळंबले आहे. उर्वरित पुलावर प्रशासनाने पथदिवे, दिशादर्शक फलक लावणे, पांढरे पट्टे मारणे, उड्डाण पुलाच्या खालची मोकळी जागा बंदिस्त करणे, रंगकाम ही कामे पूर्ण केली आहेत.
दरम्यान, या उड्डाणपुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण अजून त्यांची तारीख व वेळ मिळालेला नाही. तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने महापालिकेने आज शेवटचा थर मारण्यासाठी नियोजन केले होते, पण दिवसभरात पावसाच्या सरी येऊन हा भाग पुन्हा ओला झाला आहे. त्यामुळे रस्ता पूर्ण सुकल्याशिवाय शेवटचा थर न मारण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक भूमिका घेत हा पूल खुला करावा या मागणीसाठी गुरुवारी (ता. ८) सकाळी ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता या पुलाच्या उद्घाटनासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयाचे राजकारण सुरू झाले आहे.
खड्डे पडले तर कामावर प्रश्नचिन्ह
उड्डाण पुलावर सध्या ‘डीबीएम’ डांबराचा थर मारला आहे. ‘बीसी’ डांबराचा थर मारणे शिल्लक आहे. हा थर न मारता किंवा ओलावा असताना काम केले व त्यावरून वाहतूक सुरू केल्यास काही दिवसांतच खड्डे पडतील. त्यानंतर पुन्हा महापालिकेने निकृष्ट दर्जाचे काम केले, अशी टीका होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने काही दिवस थांबण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.
पाऊस थांबल्याने उड्डाण पुलावर डांबराचा शेवटचा थर मारण्यासाठी पाहणी केली. पण हा भाग ओलसर असताना थर मारल्यास खड्डे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कडक ऊन पडल्यास हा भाग सुकेल. त्यामुळे आणखी दोन-तीन दिवसांनी थर मारण्याबाबत विचार करू.
- युवराज देशमुख, अधिक्षक अभियंता, प्रकल्प विभाग.