Traffic  Tendernama
पुणे

धक्कादायक! ट्रॅफिकमुळे गती खुंटलेल्या शहरांत पुणे देशात दुसरे

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : वाहनाच्या गर्दीने तुंबलेले रस्ते, वाहतूक कोंडीत (Traffic Jam In Pune City) पुणेकरांचा कोंडणारा श्वास हे चित्र जरी नेहमीचे असले तरीही त्याची दाहकता आता दिवसेंदिवस वाढत जात आहे. मागच्या वर्षभरात पुण्यात सुमारे दोन लाख ९२ हजार नव्या वाहनाची भर पडली आहे. दिवसाला ८०० नवीन वाहने पुण्यातील रस्त्यांवर धावत आहे. यामुळे वाहतुकीवर ताण तर येतच आहे. शिवाय अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे.

पुण्यात सद्यःस्थितीत सुमारे ४४ लाखांहून अधिक वाहने धावत आहेत. अन्य शहरांच्या पासिंगची वाहने तर वेगळीच, शिवाय फ्लोटिंग वाहनांची संख्या देखील लाखोंच्या घरात आहे. एक एप्रिल २२ ते ३१ मार्च २३ दरम्यान पुणे आरटीओकडे दोन लाख ९२ हजार २५९ नव्या वाहनाची नोंद झाली आहे. यात दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे. तसेच चारचाकी, रिक्षा याच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. पुण्यातील वाढती वाहन संख्या हे येत्या काळात निश्चितच सर्वांसाठी त्रासदायक ठरेल.

अशी वाढली वाहने
दुचाकी : १ लाख ८५ हजार ६६६
चारचाकी : ७६ हजार २२४
मालवाहतूक : ९०५६
बस : ८९९
अन्य वाहने : ८६६८
एकूण वाहन संख्या : २ लाख ९२ हजार २५९


इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पुणेकरांनी इलेक्ट्रिकल वाहनांना चांगला प्रतिसाद दिला आहे. मागच्या वर्षी १० हजार असणाऱ्या वाहनांची संख्या यंदाच्या वर्षी ३० हजारच्या घरात गेली आहे. यात देखील दुचाकीची संख्या अधिक आहे.
दुचाकी : २७ हजार ६७९
चारचाकी ः १ हजार ८२५
मालवाहतूक : १५५
रिक्षा : ४२
बस : १५०
एकूण संख्या : २९ हजार ८५१

याचा परिणाम काय?
पूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागांतच वाहतूक कोंडी होत होती. आता सगळीकडेच वाहतूक कोंडी होत आहे. मोठ्या रस्त्यावर देखील हीच परिस्थिती आहे. नुकतेच जागतिक स्तरावर काम करणाऱ्या संस्थेने जगातील प्रमुख देशातील वाहतुकीचा अभ्यास करून अहवाल मांडला. यात वाहतूक कोंडीमुळे गती खुंटलेल्या शहरांत पुणे शहर हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. अशीच वाहनाची संख्या वाढत राहिली तर पुणे हे देशातील क्रमांक एकचे शहर बनेल. सततची वाहतूक कोंडी तसेच पार्किंगच्या सुविधेवर देखील परिणाम होईल.

यंदाच्या वर्षी वाहन विक्रीला पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे तीन लाख नवी वाहने पुणे आरटीओकडे नोंद झाली आहेत.
- डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

वाहनांची संख्या वाढल्याने साहजिकच त्याचा अन्य बाबीवर परिणाम होईल. याचा सर्वाधिक परिणाम वाहतूक कोंडीवर तर होईलच शिवाय पार्किंगचा देखील प्रश्न गंभीर होणार आहे.
- संजय ससाणे, वाहतूक तज्ज्ञ, पुणे