Driving Licence Tendernama
पुणे

RTO : का झोपलीय 'सारथी'ची यंत्रणा? देशातील 25 कोटी जणांचा डेटा हरवलाय का?

Pune : 'सारथी' प्रणालीच्या सर्व्हर बिघाडामुळे वाहन परवान्यांची प्रक्रिया स्थगित

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : केंद्र सरकारच्या ‘सारथी’ संकेतस्थळाच्या ‘सर्व्हर’मध्ये गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्यामुळे देशातील वाहन परवाने देण्याची प्रक्रिया गेल्या आठ दिवसांपासून ठप्प झाली आहे. ‘सारथी’वर आत्तापर्यंत काढण्यात आलेल्या २५ कोटी वाहन परवान्यांची माहिती (डेटा) गहाळ झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले.

या बाबत ‘नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर’कडून (NIC) बिघाड दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, ही यंत्रणा कधी सुरू होणार, या बाबत राज्यातील अथवा केंद्र सरकारमधील कोणीही स्पष्ट सांगण्यास तयार नाही.

गेल्या आठ दिवसांपासून पुण्यासह देशभरातील विविध ‘आरटीओ’ कार्यालयांतील वाहन परवाना देण्याची यंत्रणा बंद आहे. ‘सारथी’ या संकेतस्थळावरून वाहन परवाना काढला जातो. मात्र या संकेतस्थळाच्या ‘सर्व्हर’मध्ये बिघाड झाला आहे. गहाळ झालेला ‘डेटा’ पुन्हा मिळविण्यासाठी ‘एनआयसी’चे काम सुरू असल्याने ही यंत्रणा बंद ठेवण्यात आली आहे.

नागरिकांना वाहन परवाना मिळण्यास कधी सुरुवात होणार याचे उत्तर राज्याच्या परिवहन आयुक्तांकडे देखील नाही. राज्याचा परिवहन विभाग यावर अधिक काही बोलण्यास तयार नसल्याने ‘डेटा’ गहाळ झाल्याच्या संशयाला बळ मिळत आहे.

‘सारथी’ची प्रणाली बंद पडल्याने पुण्यासह देशभरात एक फेब्रुवारीपासून एकाही नागरिकाला परवाना मिळाला नाही. राज्यात दररोज १५ हजार शिकाऊ, तर १० हजार पक्के, तसेच परवान्यांतील दुरुस्ती, दुबार आदी २५ हजार परवान्यांवर काम होते. राज्यात एकूण ५० हजार परवाने (लायसन्स) रोज दिले जातात.

अनेक नागरिक वाहन परवाना काढण्यासाठी सध्या ‘आरटीओ’ कार्यालयात गर्दी करीत आहेत. मात्र त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. ‘आरटीओ’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील या बाबतची अधिक माहिती नसल्याने कार्यालयात येणाऱ्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. गेल्या आठ दिवसापासून ‘आज संध्याकाळ पर्यंत सुरू होईल’, असा वायदा ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांचा आहे, मात्र प्रत्यक्षात वाहन परवान्याचा भरकटलेला हा ‘सारथी’ कधी ‘वाटेवर’ येईल हे आता सांगणे तरी कठीण आहे.

यंत्रणेत बिघाड झाल्याने ‘अपॉइंटमेंट’ घेतलेल्या नागरिकांना वाहन परवाना मिळाला नाही. त्यांना ‘आरटीओ’ प्रशासनाने शनिवारी व रविवारी ‘अपॉइंटमेंट’ न घेता परवान्यासाठी ‘स्लॉट’ उपलब्ध करून चाचणी घेतली पाहिजे. यंत्रणेतील बिघाडाचा फटका नागरिकांना बसत आहे. लवकरात लवकर दोष दूर व्हावा.

- विठ्ठल मेहता, ड्रायव्हिंग स्कूल चालक, पुणे

‘सारथी’मध्ये निर्माण झालेला हा बिघाड हा देशपातळीवरचा आहे. कोणत्या कारणांमुळे बिघाड झाला आहे, हे मला सांगता येणार नाही. बिघाड दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र यंत्रणा कधी पूर्ववत होईल हे निश्चित सांगता येणार नाही.

- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई