पिंपरी (Pimpri) : दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांकडून नियमबाह्य भाडेवाढ करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ - RTO) कारवाईचा बडगा उगारला.
दिवाळीत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘आरटीओ’च्या वायुवेग पथकाने एकूण १३४ वाहनांवर कारवाई केली. त्यामध्ये जादा भाडेवाढ केलेल्या ४३ ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कारवाई केली आहे. याखेरीज, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणीही अनेकांवर कारवाई केली आहे. या सर्वांकडून सुमारे एक लाख ९३ हजार रुपयांचा दंड ‘आरटीओ’ने वसुल केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात रोजगार आणि शिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये मराठवाडा, विदर्भासह कोकणातील मंडळी अधिक आहेत. दिवाळीसाठी अनेक जण कुटुंबासह गावी जातात.
सुरक्षित, सवलतीमधील आणि अल्पदरात प्रवासाची सुविधा असलेल्या रेल्वे आणि एसटी बसच्या प्रवासास त्यांची पहिली पसंती असते. मात्र, तीन महिन्यांपूर्वीच रेल्वेची आरक्षण तिकिटे संपल्याने तसेच एसटीचे देखील आरक्षण फुल्ल झाल्याने यंदा प्रवाशांना खासगी बस ट्रॅव्हल्सकडे मोर्चा वळवावा लागला. त्यांचा गैरफायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सुमारे तिप्पट भाडे आकारल्याचे समोर आले होते.
वाहतुकीच्या नियमांनुसार, ‘आरटीओ’ने सणासुदीच्या हंगामात एसटी तिकीटाच्या दीडपट किंवा पन्नास टक्के भाडेवाढ करण्याची सवलत खासगी वाहतुकदारांना दिली आहे. परंतु काही ट्रॅव्हल्स कंपन्यांनी त्याची पायमल्ली करून प्रवाशांकडून तिप्पटीने भाडे वसुल केले. त्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होताच ‘आरटीओ’च्या वायुवेग पथकाने दोषी ४३ ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला. निगडी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, दापोडी, पिंपळे सौदागर, सांगवी आदी भागांत थांबा घेणाऱ्या ट्रॅव्हल्स धारकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून एक लाख ९३ हजार एवढा दंड वसूल केला आहे.
अवजड वाहनांच्या कारवाईकडे दुर्लक्ष
पिंपरी-चिंचवड शहरात अनेक अवजड वाहने नियमबाह्य पद्धतीने दिवसा देखील दाखल होत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक विभागाची असल्याचे ‘आरटीओ’ म्हणणं आहे. मात्र, दोन्ही विभागांनी हात वर केल्याने शहरात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे.
जादा भाडे आकारणाऱ्या ४३ खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कारवाई केली आहे. त्यासह एकूण १३४ वाहनांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून एक लाख ९३ हजार रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे. शहरात अवजड वाहने दाखल होत असल्यास त्यांच्यावर कारवाईची जबाबदारी वाहतूक शाखेची आहे.
- संदेश चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड
कारवाईची आकडेवारी...
- तपासलेली वाहने - ३९९
- दोषी आढळलेली वाहने - १३४
- जादा भाडे आकारणाऱ्या बस - ४३
- अवैधरित्या मालवाहतूक करणाऱ्या बस - २३
- इतर नियम मोडणारी वाहने - ६८