पुणे (Pune) : कामानिमित्ताने शहरात आलेले रामभाऊ बऱ्याच दिवसांनी एसटीने मूळ गावी अहमदनगरला निघाले होते. एसटी सुरू झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता. प्रवासादरम्यान त्यांनी पाण्याची बाटली विकत घेतली. तिच्यावर १५ रुपये छापील किंमत असताना विक्रेत्याच्या मागणीनुसार २० रुपयांना बाटली विकत घेताना रामभाऊंचा चेहरा पडला. अशी लूट एकट्या रामभाऊंची नाही, तर पुण्यासह राज्यातील एसटी आगारांमध्ये सुरू आहे.
एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने ‘नाथजल’ नावाने बाटलीबंद पाण्याची विक्री राज्यातील सर्व एसटी स्थानकांवर केली जाते. मात्र, एका लिटरच्या बाटलीवर १५ रुपये छापील किंमत असताना विक्रेत्यांकडून सर्रासपणे २० रुपयाला विक्री सुरू आहे. पुणे स्थानक, वाकडेवाडी (शिवाजीनगर), स्वारगेट या आगारात पाहणी केल्यावर हा प्रकार समोर आला. बाटलीबंद पाण्याच्या विक्रीतून एसटी महामंडळाच्या उत्पन्नाला आधार मिळण्याऐवजी याचा फायदा खासगी विक्रेत्यांनाच अधिक होत आहे.
पाणीपुरवठ्यासाठी खासगी संस्था...
बाटलीबंद पाणीपुरवठ्यासाठी पुण्यातील एका खासगी संस्थेची निवड केली आहे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची महान परंपरा आहे. त्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या गुरूला ‘नाथ’ या नावानं संबोधले जाते. त्यांच्या आदराप्रित्यर्थ एसटीच्या अधिकृत बाटलीबंद पेयजलास ‘नाथजल’ हे नाव दिले आहे. मात्र, याचा विसर विक्रेत्यांना पडला असल्याचे दिसून येत आहे.
विक्रेत्यांना लाखोंचा फायदा
पुणे विभागातील १३ आगारांमधील स्टॉलवरून मार्च महिन्यात दोन लाख १६ हजार बाटल्यांची विक्री झाली. विक्रेते एका बाटलीमागे ५ रुपये अधिक आकारतात, तर यातून त्यांनी १० लाख ८० हजार रुपये निव्वळ कमावल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. तसेच, विक्रीतून मिळणारा नफा हा वेगळाच. राज्यातील सर्वच आगाराचा विचार केल्यास हा आकडा कोटींमध्ये जाऊ शकतो.
सांगली ते पुणे असा प्रवास केला. त्यादरम्यान ‘नाथजल’ नावाची पाणी बाटली दोनदा विकत घेतली. दोन्ही वेळेस २० रुपये मोजले. पाणी पिल्यानंतर बाटलीवरील छापील किंमत पाहिली, तर १५ रुपये होती. मात्र, सर्रासपणे २० रुपयांना तिची विक्री केली जात आहे. १५ रुपयांना बाटली मिळते, याची कुठेही माहिती दिलेली नाही. ही लूट असून ती थांबली पाहिजे.
- माधव मगदूम, प्रवासी
एसटी प्रशासन म्हणते...
पाणी विक्रेत्यांनी नाथजलची किंमत मोठ्या अक्षरात लिहावी, अशा सूचना दिल्या आहेत. किमतीचे फलकही लावले जातील. छापील किमतीनेच बाटलीची विक्री करणे अपेक्षित आहे. प्रवाशांनी आगारात लेखी तक्रार करावी, त्यानुसार कारवाई केली जाईल, असे एसटीच्या पुणे विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
पाण्याची बाटलीची किंमत
१ लिटर ः १५ रु.
६५० मिलिलिटर ः १० रु.
एसटीला किती पैस मिळतात?
- ६५० मिलिमीटरच्या बाटलीमागे ४५ पैसे
- एक लिटर बाटलीमागे एक रुपया