Road Accidents Tendernama
पुणे

Road Accidents : आरटीओच्या 'त्या' प्रयोगामुळे रस्ते अपघात कमी होणार का?

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : वाढते रस्ते अपघात (Road Accidents) रोखण्यासाठी राज्य परिवहन विभाग आता खासगी संस्थेची मदत घेत आहे.

शिकाऊ परवाना अर्जदारांना वाहतूक नियमांचे प्रशिक्षण देणे आणि वाहतूक नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ - RTO) ‘रस्ता सुरक्षा व अनुभव प्रयोगशाळा’ (रोड सेफ्टी लॅब) सुरू केली आहे. येथे अर्जदाराला प्रथम वाहतूक जागरूकता प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे शिकाऊ उमेदवारांमध्ये वाहतूक नियमाबाबत जागरूकता निर्माण होत असून त्याचा ऑनलाइन चाचणीत फायदा होत असल्याचे उमेदवार सांगत आहेत.

रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्य परिवहन विभागाने ‘क्रूझिंग सेफ’ या खासगी संस्थेची मदत घेत २ मे २०२४ पासून पिंपरी-चिंचवड आरटीओमध्ये ही ‘रोड सेफ्टी ॲण्ड एक्सपिरियन्स लॅब’ सुरू केली आहे. आतापर्यंत या लॅबमध्ये ६५०० पेक्षा जास्त शिकाऊ उमेदवारांनी प्रशिक्षण घेतले आहे.

शिकाऊ वाहन परवान्यासाठी (लर्नर लायसन्स) चाचणीला बसण्यापूर्वी उमेदवारांना तीन स्तरांच्या चाचण्यांमधून जावे लागते. पिंपरी-चिंचवड आरटीओसह पुणे, बारामती या तीन आरटीओमध्ये ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आलेली आहे, अशी माहिती केंद्र व्यवस्थापक तेजस पाठकरी यांनी दिली.

असे दिले जाते प्रशिक्षण...

शिकाऊ परवान्यासाठी आलेल्या उमेदवारांची बायोमॅट्रिक हजेरी झाल्यानंतर त्यांना या लॅबमध्ये जावे लागते. लॅबमध्ये एका वेळी १५ उमेदवार बसण्याची सोय असून प्रत्येकाला एक टॅब दिला जातो. त्यामध्ये व्हिडीओच्या माध्यमातून ३० मिनिटांचे सत्र घेतले जाते. या सत्रात वाहतुकीचे नियम मोडल्यास होणाऱ्या दंड, रस्ते सुरक्षितता संदर्भातील प्रश्‍न-उत्तरे असतात तसेच चिन्हे, कलमांची माहिती दिलेली असते. मात्र, तत्पूर्वी आरटीओ मोटार वाहन निरीक्षक उमेदवारांना मार्गदर्शन करतात.

गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघात रोखण्यासाठी केवळ वाहनचालकांचे समुपदेशन नाही; तर प्रशिक्षणाचीही गरज आहे. त्या अनुषंगाने आरटीओ कार्यालयात उभारण्यात आलेली ही लॅब वाहन चालकांसाठी फायदेशीर ठरत आहे.

- सुरेश आव्हाड, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड कार्यालय

पिंपरी-चिंचवड आरटीओमध्ये सुरू करण्यात आलेल्या या लॅबद्वारे घेण्यात येणारी चाचणी उमेदवारांना बंधनकारक नाही. या प्रयोगशाळेत कोणीही वाहतूक नियमांबाबत माहिती घेऊ शकतो. या चाचणीमुळे वाहन चालकांना वाहतूक नियमांची अधिक चांगली माहिती मिळते. शिकाऊ उमेदवारांच्या या फीडबॅकमुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

- तेजस पाठकरी, केंद्र व्यवस्थापक