Ring Road Tendernama
पुणे

रिंगरोडमुळे पुण्याला मिळणार दिलासा; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या बाहेरून रिंगरोड प्रस्तावित आहे. त्याचे काम सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या रस्त्यामुळे उद्योगनगरीतील वाहतूक कोंडी दूर होणार असून, चार राष्ट्रीय महामार्ग, एक राज्य मार्ग, एक द्रुतगती मार्ग आणि एका पालखी मार्गाशी शहराची थेट कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

मावळ तालुक्यातील परंदवाडी, उर्से, तळेगाव दाभाडे, वडगाव, कातवी, आंबी, वराळे, आकुर्डी, नाणोलीतर्फे चाकण, इंदुरी, सुदवडी, सुदुंबरे, खेड तालुक्यातील खालुंब्रे, निघोजे, मोई, कुरळी, चिंबळी, केळगाव, आळंदी देवाची, चऱ्होली खुर्द, धानोरे, सोळू, मरकळ, गोळेगाव या गावांतून रिंगरोड जाणार आहे. ही सर्व गावे पिंपरी-चिंचवड शहरालगत आहेत. यातील निघोजे, मोई, कुरळी, चिंबळी, केळगाव, आळंदी देवाची, चऱ्होली खुर्द, धानोरेही गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याचे प्रस्तावित आहे. तसे झाल्यास रिंगरोडचा थेट उद्योगनगरीशी संपर्क येईल. शिवाय सोळू, मरकळ व हवेली तालुक्यातील तुळापूर, लोणीकंद येथून शहर औरंगाबाद महामार्गाला आणि पेरणे, बकोरी, डोंगरगाव, वाडेबोल्हाई, गावडेवाडी मार्गे सोलापूर महामार्ग व पालखी मार्गाला ‘कनेक्ट’ होणार आहे. यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, बंगळरू महामार्ग, जुना पुणे-मुंबई महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग, नगर-औरंगाबाद रस्ता, सोलापूर महामार्ग, पंढरपूर पालखी मार्ग जोडले जाणार आहे. या मार्गांनी जाणारी वाहतूक रिंगरोडमुळे वळून शहराच्या बाहेरूनच इच्छितस्थळांकडे वळवली जाईल.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग व जुना पुणे-मुंबई महामार्गाने येणारी वाहने देहूरोड कात्रज बाह्यवळण मार्गे; निगडी-दापोडी मार्ग; चिखली, मोशी, चऱ्होली मार्ग इच्छितस्थळी जातात. त्यामुळे पुनावळे, ताथवडे, भुजबळ चौक, भूमकर चौक, डांगे चौक, वाकड, दापोडी हॅरिस ब्रिज, चिखली, राजा शिवछत्रपती चौक (वखार महामंडळ गोदाम चौक), भोसरी, टेल्को रस्ता, भारतमाता चौक मोशी, चऱ्होली फाटा, देहू फाटा आळंदी आदी ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होते. बाह्यवळण मार्गावरही नेहमीच कोंडीचा सामना करावा लागतो. रिंगरोडमुळे पिंपरी-चिंचवडसह पुणे शहरही कोंडीमुक्त होण्यास मदत होईल.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचआय ः नॅशनल हायवे ॲथॉरिटी) पुणे ते औरंगाबाद ग्रीन कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कॉरिडॉर रिंगरोडला मिळणार असून, दहा गावांतून जाणार आहे. शिवाय, चऱ्होलीलगतच्या धोनोरेपासून सोळू, मरकळ, तुळापूर या गावांतून जाणाऱ्या रिंगरोडमुळे पिंपरी-चिंचवड शहर पुणे-औरंगाबाद महामार्गाला थेटपणे जोडले जाणार आहे. यामुळे १५ ते २० किलोमीटर अंतर कमी होणार आहे.

पुणे-औरंगाबाद मार्गावर जाण्यासाठी सद्यःस्थितीत तीन मार्ग आहेत. मात्र, सोळू, मरकळ, तुळापूर मार्गे लोणीकंद रस्ता एकेरी असून, तो रस्ता खूप खराब झाला आहे. तुळापूर येथील इंद्रायणी नदीवरील पूल मोडकळीस आल्याने तीन महिन्यांपासून जड वाहतूक बंद केली आहे. चाकण, शेल पिंपळगाव मार्गे शिक्रापूर रस्त्यावर वारंवार कोंडी होते. काही ठिकाणी खड्डेही आहेत. त्यामुळे येरवडा मार्गे जाणेच वाहनचालक पसंत करतात. मात्र, हा १५ ते २० किलोमीटरचा वळसा आहे.