Redevelopment Tendernama
पुणे

Redevelopment: पुणे मनपा हद्दीत का वाढतोय पुनर्विकासाचा ट्रेंड?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कमी गुंतवणूक, चांगले लोकेशन, पायाभूत सुविधा (पाणी, रस्ते, सांडपाणी वाहिन्या आदी) आणि सदनिका विक्रीची खात्री या व अशा अनेक गोष्टींमुळे बांधकाम क्षेत्रातील अनेकांचा कल जुन्या सोसायट्यांच्या पुनर्विकासाकडे वाढतो आहे. परिणामी, नवीन जागा घेऊन ती विकसित करण्यापेक्षा रिडेव्हलपमेंट क्षेत्रात (Redevelopment Sector) दिवसेंदिवस गुंतवणूक वाढत आहे.

पुणे महापालिकेच्या हद्दीत १९९७ मध्ये २३ गावे समाविष्ट झाली. त्यानंतर २०१७ मध्ये ११ गावे आणि २०२१ मध्ये २३ गावे समाविष्ट झाली आहेत. महापालिकेच्या हद्दीत जुन्या विकसनासाठी मोकळ्या जागा शिल्लक राहिल्या नाहीत. जी गावे समाविष्ट झाली, त्यामध्येही बोटावर मोजण्याइतक्या जागा मोकळ्या आहेत. तर वाढत्या नागरीकरणामुळे जमिनींच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. त्यामुळे नवीन जागेत गुंतवणुक करणे, ती विकसित करण्यासाठी मोठे भांडवल लागते.

बांधकाम नकाशे मंजूर करून काम पूर्ण करण्यापर्यंतचा कालावधी पाहता बराच काळ जातो. त्याशिवाय, ज्या परिसरात नवीन बांधकाम होत आहेत, त्या भागात पाणी, रस्ते यांसारख्या सुविधा पुरेशा उपलब्ध आहेत का नाही?, हे पहावे लागते. त्यानंतरही सदनिकांची विक्रीची खात्री नसते. याउलट जुन्या सोसायट्यांना तुलनेने कमी भांडवल लागते. तसेच सदनिका विक्रीची खात्री अधिक असते. नवीनच्या तुलनेत नफा कमी असला, तरी धोका कमी असतो आणि चांगल्या ठिकाणी विकसनाचे काम करण्याची संधी मिळत असल्यामुळे अनेकांचे कल या क्षेत्राकडे वाढत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

पुनर्विकास का गरजेचा?

कोथरूड, कर्वेनगर, एरंडवणा, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, मॉडेल कॉलनी, सहकारनगर असो की पर्वती, सिंहगड रस्ता परिसरात ३० ते ४० वर्षे जुन्या सोसायट्यांची संख्या जास्त आहेत. पूर्वी या भागात चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वापरण्यास मर्यादा होती. त्यामुळे पाच ते सहा मजल्यांच्या आणि भरपूर मोकळी जागा असलेल्या या सोसायट्या मोक्याच्या जागांवर आहेत. त्यांचा आता पुनर्विकास करणे गरजेचे आहे.

का वाढतो आहे कल?

- जागेच्या मालकी हक्काबाबत स्पष्टता

- पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने अडचण दूर

- नवीन जागेच्या तुलनेने गुंतवणूक कमी

- मोक्याच्या जागा मिळत असल्याने सदनिका विक्रीची खात्री

- ॲमेनिटी स्पेस, ओपन स्पेससाठी जागा सोडण्याचे बंधन नाही

- वीस हजार चौरस फुटांच्या आत बहुतांश जागा असल्याने पर्यावरण ‘एनओसी’ची गरज नाही

- एक एकराच्या वर क्षेत्रफळ असल्यानंतरही ‘म्हाडा’साठी २० टक्के सदनिका देण्याचे बंधन नाही

- बांधकाम परवानगी मिळण्यास फारशी अडचणी नाही

- ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक बांधकाम न करता साचेबद्ध पद्धतीने काम

पुनर्विकासासाठी सध्या पोषक वातावरण आहे. पायाभूत सुविधा असलेल्या ठिकाणी मोकळ्या जागा आता शिल्लक नाहीत. या उलट चांगले लोकेशन, कमी गुंतवणूक आणि सदनिकांच्या विक्रीची खात्री अशा अनेक गोष्टींमुळे बांधकाम व्यावसायिकांचा कल या क्षेत्राकडे वळत चालला आहे. पूर्वी ज्या ठिकाणी राहतो, त्याच ठिकाणी नवीन आणि मोठे घर मिळते, या भावनेने सोसायट्याही पुनर्विकासासाठी पुढे येत आहेत. दोन्ही घटक एकत्र येत असल्यामुळे पुनर्विकासाला चालना मिळत आहे.

- नितीन देशपांडे, उपाध्यक्ष, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना