पुणे (Pune) : संततधार पावसामुळे वनाज ते रामवाडी मार्गावरील बंडगार्डन मेट्रो स्टेशनच्या छताला गळती लागली आहे. या गळतीमुळे जिना ओला आणि निसरडा झाला आहे. त्यामुळे प्रवासी घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी मेट्रो व महापालिका अधिकाऱ्यांकडून जलद सुधारणा करण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
बंडगार्डन येथील नव्याने झालेल्या मेट्रो स्थानकाच्या छतामधून गळती लागली आहे. त्यामुळे मेट्रोच्या नव्याने तयार केलेल्या कामाच्या दर्जाबाबत प्रवाशांनी शंका व्यक्त केली आहे. मुसळधार पावसाच्या तडाख्यातून नव्याने बांधलेली मेट्रो स्थानकेदेखील सुटली नसल्याचे चित्र आहे. मेट्रो स्थानकाच्या छतातून टपकणारे पाणी जिन्यावर इतरत्र पसरून प्रवाशांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून मेट्रो कर्मचाऱ्यांनी प्लॅस्टिकची बादली ठेवली आहे. पायऱ्या निसरड्या झाल्या असल्यामुळे प्रवासी घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येवू शकत नाही.
‘मेट्रोचे काम चालू असताना मेट्रोचे अधिकारी व महापालिकेचे संबंधित अधिकारी यांनी लक्ष न दिल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. छतामधून पाणी गळती होणार नाही याकडे गांभिर्याने लक्ष दिले गेले नाही,’’ असा आरोप प्रवासी तुषार जाधव यांनी केला आहे.