पुणे

Vande Bharat चे प्रवासी घटल्याने रेल्वे घेणार मोठा निर्णय; लवकरच..

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या सोलापूर - पुणे - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेससह (Solapur Mumbai Vande Bharat Express) देशातील अन्य वंदे भारत गाड्यांना प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळतो आहे. चाळीस टक्क्यांहून अधिक आसने रिकामी राहत असल्याने रेल्वे बोर्डाने वंदे भारतच्या तिकीट दरांचा फेर आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचाच एक भाग म्हणून ज्या रेल्वे विभागातून वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या धावत आहे, त्या विभागातील एसटीच्या तिकीट दराची माहिती रेल्वे बोर्डाने मागवली आहे. पुणे विभागाने देखील ही माहिती दिली आहे. रेल्वे प्रशासन वंदे भारत एक्स्प्रेसचे व एसटीचे तिकीट दर याचा तुलनात्मक अभ्यास करूनच आता वंदे भारतचे नवे तिकीट दर ठरविणार आहे. तिकीट दरात ३० टक्क्यापर्यंत घट होण्याची शक्यता आहे.

वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास जरी आरामदायक व सुविधायुक्त असला तरी त्याचे तिकीट दर अन्य एक्स्प्रेस व सुपरफास्टच्या तुलनेत खूपच जास्त आहेत. शिवाय त्याचा वेग देखील अन्य रेल्वे गाड्याइतकाच आहे. त्यामुळे वेळेत देखील फारशी बचत होताना दिसत नाहीत. या कारणांमुळे प्रवासी आता वंदे भारत एक्स्प्रेसकडे पाठ फिरवत आहेत.

पुण्याहून धावणाऱ्या सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला सरासरी ६० टक्के प्रतिसाद लाभत आहे. नागपूर-बिलासपूरची स्थिती आणखी गंभीर आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आता देशातील सर्वच वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे तिकीट दर कमी करण्याचा विचार करीत आहे. यासाठी ते एसटीच्या तिकीट दराशी तुलना करीत आहे. येत्या काही दिवसांत यावर उत्तर निर्णय घेतला जाईल.

प्रवासी का घटले?
१. अन्य एक्सप्रेसच्या तुलनेत वंदे भारत एक्सप्रेसचा तिकीट दर खूपच जास्त आहे. हे दर सामान्य प्रवाशांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत.
२. ताशी १६० किमीने धावण्याची क्षमता, मात्र प्रत्यक्षात ताशी ११० किमी वेगानेच धावत आहे. अन्य रेल्वे देखील ताशी ११० किमी वेगाने धावते.
३. वंदे भारत एक्सप्रेसला विशेष दर्जा असल्याने या गाडीला क्रॉसिंगला थांबवले जात नाही. मात्र, यामुळे वेळेत फारशी बचत होत नाही.
४. वंदे भारत एक्स्प्रेस व अन्य सुपरफास्ट गाड्याच्या वेळेत ३० मिनिटांचा फरक आहे. अर्धा तासाच्या बचतीसाठी दुप्पट तिकीट दर असलेल्या वंदे भारतने प्रवास करण्यास प्रवाशांची नापसंती आहे.