Pune Railway Station Tendernama
पुणे

पुणे रेल्वे स्टेशनवरील अपुऱ्या सुविधांमुळे चार ठेकेदारांना दंड

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : दोन वर्षांपासून पादचारी पुलांना जोडणारा रॅम्प बंद, प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी असलेले एकमेव वॉटर एटीव्हीएम अनेकदा बंद, फलाटावरील स्वच्छतागृह बंद, खाद्यपदार्थांचा दर्जा खराब आहे.... अशी स्थिती पुणे रेल्वे स्थानकावर पाहावयास मिळाली. प्रवाशांना ज्या प्राथमिक सुविधा मिळायल्या हव्यात, त्या देण्यात पुणे रेल्वे प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका रेल्वे मंत्रालयाने गठण केलेल्या समितीने ठेवला. तसेच अपुऱ्या सुविधांमुळे चार ठेकेदारांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंडही केला.

रेल्वे मंत्रालयाने स्थापन केलेल्या प्रवासी सुविधा समितीने पुणे स्थानकाची शनिवार व रविवारी पाहणी केली. यात त्यांना स्थानकांवर अनेक ठिकाणी उणिवा आढळून आल्या. डीआरएम रेणू शर्मा यांच्या निदर्शनास या बाबी आणून देण्यात आल्या आहेत. तसेच, याचा अहवालही रेल्वे बोर्डाला सादर केला जाणार आहे. रेल्वे बोर्ड समिती पुणे विभागाच्या दौऱ्यावर आले होते. चार ते पाच सदस्यांनी पुण्यासह विविध स्थानकांवर फिरून पाहणी केली. मात्र, पुणे स्थानकावरील अपुऱ्या सुविधांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

का आणि कुणाला केला दंड?

पुणे स्थानकावरील फलाट एकवरील एका अधिकृत खाद्य विक्रेत्याला दंड करण्यात आला. तो विकत असलेला खाद्यपदार्थ निष्कृष्ट दर्जाचा आढळून आला. त्याबाबत त्याला १० हजार रुपयांचा दंड केला. यासह पार्किंग, फलाटावरील स्वच्छतागृहाच्या ठेकेदारास दंड केला आहे. फलाट एक सोडला तर अन्य फलाटांवरील स्वच्छतागृह बंद ठेवले जातात. यात दिव्यांगांसाठीच्या स्वच्छतागृहाचा समावेश आहे. असुविधेबाबत अधिकाऱ्यांनाही चांगलेच फैलावर घेण्यात आले.

काय आढळले पाहणीत...

१) रॅम्प बंद असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय.

२) रॅम्प नसल्याचा ताण सरकत्या जिन्यावर.

३) फलाट एकवरून दोन, तीन, तसेच पाच, सहावर जाणे त्रासदायक.

४) स्थानकाच्या सोलापूर दिशेने कोणत्याच सुविधा नाहीत.

५) पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

६) फलाटासह ट्रॅक ॲपरनवर अस्वच्छता.

७) डीआरएम ऑफिसजवळचे पार्किंगही अस्वच्छ.

८) स्थानकावरील सीसीटीव्ही सुरक्षेच्यादृष्टीने कुचकामी.

९) वेटिंग रूममध्ये चार्जिंग पॉइंटचा अभाव