Pune Railway Station Tendernama
पुणे

Pune : रेल्वेच्या 'या' एका निर्णयामुळे 70 हजार प्रवाशांचा वेळ वाचणार

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : दौंड कॉडलाइनचे दुहेरीकरण होणार असून, दुहेरी लाइन झाल्यानंतर पुण्याहून मनमाडच्या दिशेने व मनमाडहुन पुण्याच्या दिशेने येणाऱ्या २८ रेल्वे गाड्यांना क्रॉसिंगसाठी दौंडच्या कॉड लाइनजवळ थांबावे लागणार नाही. यामुळे रेल्वेगाड्यांच्या वेळेत किमान ३० मिनिटांची बचत होणार आहे. अप आणि डाऊन लाइन झाल्यानंतर दोन्ही मार्गिकांवरून रेल्वेगाड्या सुसाट धावतील. सोलापूर रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून हे काम केले जाणार आहे. डिसेंबर २०२४पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना याचा मोठा फायदा मिळणार आहे.

दौंड कॉडलाइन एकेरी असल्याने पुण्याहून मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांना क्रॉसिंगसाठी पाटसजवळ थांबावे लागते. तर मनमाडहुन येणाऱ्या रेल्वेगाड्यांना काष्टीजवळ थांबावे लागते. एकच मार्गिका असल्याने एखाद्या रेल्वेला तरी क्रॉसिंगसाठी थांबावे लागत आहे. याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसत आहे. रेल्वे प्रवाशांची सोय व्हावी, त्यांच्या वेळेत बचत होण्यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाने कॉडलाइनच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव दिला. त्याला मंजुरीदेखील मिळाली.

सोलापूर विभाग करणार काम

दौंड ते मनमाडदरम्यान सध्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. कॉडलाइनचे कामदेखील या प्रकल्पांतर्गत केले जाणार आहे. त्यासाठी वेगळ्या निधीची आवश्यकता भासणार नाही. डिसेंबर २०२४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सोलापूर विभागाकडून हे काम केले जाणार आहे.

७५० मीटर लांबीचा नवा फलाट

दौंड कॉडलाइनवर सध्या एक फलाट आहे. याच फलाटावर अप आणि डाऊन रेल्वेगाड्या थांबतात. दुसरी मार्गिका झाल्यावर दुसऱ्या बाजूलादेखील एक ७५० मीटर लांबीचा फलाट बांधण्यात येणार आहे. त्यामुळे अप व डाऊन गाड्यांसाठी स्वतंत्र फलाट असणार आहे. दोन फलाट झाल्यानंतर प्रवाशांच्या दृष्टीनेदेखील ते सोयीचे होणार आहे.

७० हजार प्रवाशांचा वेळ वाचणार

१. सामान्यपणे एका रेल्वेतून सरासरी २५०० प्रवासी करतात प्रवास

२. दौंड कॉडलाइनवर आणखी एक मार्गिका आल्याने रेल्वेला क्रॉसिंग होणार

३. अप आणि डाऊन मिळून रोज या मार्गावरून २८ रेल्वे गाड्या धावतात. यातून सुमारे ७० हजार प्रवाशांची वाहतूक

४. एका गाडीला क्रॉसिंगला सुमारे ३० मिनिटे

५. डबल लाइनमुळे क्रॉसिंगला थांबावे लागणार नाही

६. पुण्याहून एखादी रेल्वे मनमाडच्या दिशेने निघाल्यावर पाटस स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांबावे लागते

७. मनमाडहुन पुण्याला येणाऱ्या रेल्वेला काष्टीजवळ थांबावे लागते

८. डबल लाइन झाल्यावर कोणत्याच रेल्वेला थांबावे लागणार नाही

दौंड कॉडलाइन ते काष्टी ब्लॉक सेक्शन आहे. त्यामुळे येथून एकावेळी एकच रेल्वे धावते. कॉडलाइनचे दुहेरीकरण झाल्यानंतर या सेक्शनमधून धावणाऱ्या २८ रेल्वेंचे क्रॉसिंग टळणार आहे. याचा फायदा प्रवाशांना होईल. शिवाय उशिराने धावणाऱ्या गाड्यांच्या वेळेतदेखील बचत होण्यास मदत मिळेल.

- डॉ. रामदास भिसे, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक, पुणे.