Railway Station Tendernama
पुणे

पुण्यात रेल्वेचा Mega Block! दिवाळीनंतर रोज ७० गाड्या होणार रद्द?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : रेल्वेने पुण्यातून देशभरात विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड मोठे आहे. पुणे स्थानकातून (Pune Railway Station) येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्याही मोठी आहे. दररोज सुमारे दीड लाख रेल्वे प्रवाशांची या स्थानकावर ये-जा असते. त्याच वेळी पुणे रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्याही २५० ऐवढी आहे. पुण्यातून सुमारे ७२ रेल्वे गाड्या सुटतात त्या वेगळ्याच. ऐवढा मोठा पसारा असलेल्या या रेल्वे स्थानकावर करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या कामासाठी प्रशासनाला ब्लॉक घ्यावा लागणार आहे. त्यामुळे दररोज सुमारे ६० ते ७० रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागणार आहेत.

पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटांची लांबी तसेच यार्ड रिमोल्डींगच्या कामास नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये सुरवात होण्याची दाट शक्यता आहे. कारण मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापकांनी तसा आदेशच दिला आहे. पुणे विभागाने याचे आधीच नियोजन केले होते; मात्र हे काम सुमारे ४० आठवडे चालणार असल्याने पुण्याहून सुटणाऱ्या व पुण्याहून धावणाऱ्या बहुतांश लांब पल्ल्याच्या रेल्वे ४० आठवडे रद्द करावे लागणार आहे.

एवढा मोठा कालावधी लागणार असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होईल. त्यामुळे पुणे रेल्वे प्रशासन काम सुरू करण्यास चालढकल करीत होता; मात्र यात खुद्द सरव्यवस्थापकांनी लक्ष घातल्याने आता या कामास सुरवात होणार हे निश्चत. यासाठी प्रशासनाला ब्लॉक घ्यावा लागेल. त्यामुळे रोज किमान साठ ते सत्तर रेल्वे रद्द होण्याची शक्यता आहे. तर काही गाड्यांचे मार्ग बदलला जाईल.

पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमोल्डींगचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चिला जातोय. २०१६-१७ मध्ये याला मंजुरी मिळाली. यासाठी ५२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात याला ३१ कोटींचा निधी मंजूर झाला, तो पुणे विभागाला मिळाला देखील; मात्र अद्याप कामास सुरवात न झाल्याने याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. यार्ड रिमोल्डींग नसल्याने फलाटांची लांबी वाढली नाही. परिणामी गाड्यांना प्रवाशांची गर्दी असताना देखील रेल्वेला डबे वाढविता येत नाहीत. परिणामी, दररोज ४० हून अधिक रेल्वेचे सुमारे १८ हजार १८४ प्रवाशांना ‘वेटिंग’वर राहावे लागते. त्यामुळे यार्ड रिमोल्डींगच्या कामास सुरवात होणे गरजेचे आहे.

पुण्याच्या परिचालन विभागाने यार्ड रिमोल्डींगच्या कामांमुळे रद्द कराव्या लागणाऱ्या रेल्वे गाड्या बाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला आधीच सादर केला आहे. शुक्रवारी पुणे दौऱ्यावर आलेल्या मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी याबाबत आढावा घेतला. कामाची उपयुक्तता लक्षात घेऊन हे काम विना विलंबाने सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून दिवाळीनंतरच कामास सुरवात होण्याची शक्यता आहे.

सुरवातीला मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्डमध्ये काम होईल. त्यांनतर फलाटाची लांबी वाढविण्याचे काम सुरु केले जाईल. यात पहिल्या टप्प्यात फलाट दोन, तीन व सहा क्रमांकाच्या फलाटांचा समावेश आहे. ही फलाटे अनुक्रमे ४७० मीटर, ५५५ मीटर व ५१० मीटर लांबीची आहेत. त्यांना ६१० मीटर लांबीचे करण्यात येईल.