Indian Railway Tendernama
पुणे

Railway : Good News! पुणे-मुंबई प्रवासाचा वेग वाढणार; कारण?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे-मुंबई दरम्यानचा रेल्वे प्रवास जलद गतीने व्हावा यासाठी बोरघाटात दोन नव्या मार्गिका टाकण्यात येणार आहे. यासाठी कोकण रेल्वेकडून सविस्तर प्रकल्प अहवालाचे (डीपीआर) काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मार्गिकेचे आरेखन करण्यासाठी ‘लिडार सर्व्हे’ झाला आहे. यात हेलिकॉप्टरवर कॅमेरा लावून सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. येत्या दोन महिन्यांत हा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर करण्यात येणार आहे.

बोरघाटात दोन नव्या मार्गिकेसाठी सात पर्याय सुचविण्यात आले आहेत. शिवाय त्याचा वेग ताशी १२० किलोमीटर इतका ठरविण्यात आला आहे. नव्या मार्गिकेमुळे घाटातील चढण कमी होणार आहे. मात्र घाटातील अंतर वाढणार आहे. या प्रकल्पासाठी आठ हजार ते १८ हजार कोटींपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. सात पर्यायांपैकी एक पर्याय निवडला जाणार आहे. खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या प्रकल्पासाठी आग्रही आहेत. त्यामुळे रेल्वे बोर्डाला ‘डीपीआर’ सादर झाल्यावर त्यास मंजुरी मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

चढाई कमी, अंतर मात्र वाढणार

बोरघाटातील आताची चढाई ही १:३७ इतकी आहे. म्हणजे एक मीटरची उंची गाठण्यासाठी ३७ मीटर जावे लागते. हा आशियातील सर्वांत जास्त तीव्र चढण असलेला रेल्वे मार्ग आहे. त्यामुळे गाड्यांना कर्जतहून लोणावळ्याच्या दिशेने येताना बँकर (पाठीमागे जोडणारे इंजिन) जोडावे लागतात. ‘डीपीआर’ हा तीव्र चढण कमी करण्यासाठी १:१००, १:७० १:८० आदी पर्याय सुचविण्यात आले आहे.

...तर घाटात पाच मार्गिका

सध्या बोरघाटात तीन मार्गिका आहे. अप, डाऊन आणि मिडल. पावसाळ्यात दरडी कोसळल्यानंतर यातील एखाद्या तरी मार्गिकेचे नुकसान होऊन ती वाहतुकीसाठी बंद होते. याचा मोठा फटका प्रवाशांना बसतो. शिवाय सातत्याने प्रवासी रेल्वे व मालगाडी धावत असल्याने रुळांची झीज होत असते. लोणावळ्याहून कर्जतकडे जाताना उतार आहे, तर कर्जतहून लोणावळा येताना तीव्र चढण आहे. त्यामुळे रुळावर ताण येतो. उताराच्या वेळी जास्त प्रमाणात ब्रेकचा वापर होतो.

या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने बोरघाटात दोन नव्या मार्गिका टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मार्गिका करताना नवीन बोगदा देखील तयार करावा लागणार आहे. नवीन मार्गिकेमुळे रेल्वे वाहतुकीसाठी एकूण पाच मार्गिका उपलब्ध होतील. परिणामी रेल्वे वाहतूक अधिक जलद व विना अडथळा होईल.

नव्या मार्गिकांचा फायदा काय?

- गाड्यांची संख्या वाढेल

- गाड्यांचा वेग कमी करावा लागणार नाही

- कर्जत-लोणावळा दरम्यान गाड्यांना बँकर लावावे लागणार नाही

- दरडी कोसळून अथवा एखाद्या मार्गावर रेल्वे अपघात झाला तर दुसऱ्या मार्गावरून रेल्वे वाहतूक सुरू राहील

- नव्या मार्गिका समतल असल्याने रुळांचे आयुर्मान अधिक राहील

- प्रवासी सेवा बाधित होणार नाही

- पुणे-मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान होईल