PWD Tendernama
पुणे

PWD: अवघ्या 40 फुटांवर दुभाजकाचे विभाजन कशासाठी?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : अनेक दिवसांपासून रखडलेले सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा ते किरकटवाडी फाटा या दरम्यानचे दुभाजकाचे काम अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) सुरू केले आहे. मात्र, सलग दुभाजक तयार न करता चाळीस ते पन्नास फूट अंतरावर जागोजागी विभाजन केल्याने या दुभाजकामुळे आणखी अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे एखादे अत्यावश्यक ठिकाण वगळता दुभाजकाचे काम सलग करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

सिंहगड रस्त्यावर नांदेड फाटा ते किरकटवाडी फाटा या दरम्यान अंदाजपत्रकामध्ये दुभाजकाचे काम प्रस्तावित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक दिवसांच्या विलंबाने रस्त्याचे काम करून घेतले. मात्र, दुभाजकाचे काम अद्यापही प्रलंबित होते.

दुभाजकासाठी रस्त्याच्या मधोमध सोडलेल्या धोकादायक फटीमुळे सातत्याने अपघात होत होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधल्यानंतर अखेर दुभाजकाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, आजूबाजूचे व्यावसायिक सांगतील त्या प्रमाणे दुभाजकाचे विभाजन करण्यात आल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता दुभाजकाचे काम सलग करून घेण्यात येईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

अगोदरच या दुभाजकाची उंची अत्यंत कमी ठेवण्यात आली आहे आणि त्यातच जागोजागी वळण्यासाठी दुभाजक खंडित करण्यात आलेला असल्याने अपघात कमी होण्यापेक्षा वाढणार आहेत. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.

- उमेश बोरकर, नागरिक

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या दुभाजकासाठी सातत्याने पाठपुरावा केला तेव्हा काम सुरू झाले आहे. मात्र, जागोजागी अनावश्यक क्रॉसिंग ठेवण्यात आले आहेत. अपघाताचा धोका असल्याने नियमानुसार व अंदाजपत्रकाप्रमाणे दुभाजकाचे काम होणे आवश्यक आहे.

- दत्तात्रेय कोल्हे, नागरिक

काम सुरू असताना आजूबाजूचे व्यावसायिक किंवा स्थानिक नागरिक वळण्यासाठी दुभाजक खंडित करायला सांगतात. मात्र, संबंधित ठेकेदाराला सलग काम करण्यास सांगितले आहे. अपवाद वगळता इतर ठिकाणी सोडलेले दुभाजकाचे काम करून घेण्यात येईल.

- ज्ञानेश्वर राठोड, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग