pune Tendernama
पुणे

Pune : भिडे वाड्यातील राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला सुरवात; लवकरच...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महापालिका प्रशासनाकडून भिडेवाडा स्मारकाचे काम सुरू करण्यात आले असून सध्या शीट पायलींगचे काम केले जात आहे. आगामी आठवड्यापासून खोदाई व त्यानंतर येत्या आठ महिन्यांत भिडे वाडा स्मारकाच्या कामाला गती मिळणार आहे.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८मध्ये देशातील पहिली मुलींची शाळा बुधवार पेठेतील भिडेवाड्यामध्ये सुरू केली होती. त्यामुळे भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर व्हावे, याबाबतची मागणी विविध संस्था, संघटनांकडून केली जात होती. अनेक आंदोलनानंतर भिडे वाड्याचे स्मारक करण्याचे निश्‍चित झाले. महापालिकेच्या मुख्यसभेत त्याबाबतचा ठराव करण्यात आला. मात्र, जागा मालक व भाडेकरूंनी न्यायालयात धाव घेतल्याने स्मारकाच्या कामात अडथळा निर्माण झाला होता.

महापालिका प्रशासनाने तब्बल १३ वर्ष न्यायालयीन लढा दिल्यानंतर न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर भिडे वाड्याची जागा महापालिकेच्या ताब्यात आली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये भिडेवाड्याच्या स्मारकाचे काम अडकून राहू नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून घाईगडबड करून आवश्‍यक उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्यात आले.

महापालिकेने भिडेवाडा स्मारकाचा खास आराखडा तयार करून घेतला. सात कोटी रुपयांच्या आराखड्यास महापालिकेने मंजुरी दिली. त्यानंतर स्मारकाच्या कामासाठी टेंडर प्रक्रिया राबविली. दरम्यान, मागील महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. भिडेवाड्याच्या परिसरातील अन्य वाड्यांना, इमारतींच्या सुरक्षिततेची काळजी घेत शीट पायलींगचे काम प्रारंभी करण्यात आले आहे.

पुढील आठवड्यापासून खोदाईच्या कामाला सुरुवात होणार आहे. संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर खोदाईला सुरुवात होऊन येत्या आठ महिन्यांत स्मारकाच्या कामाला चांगली गती येण्याची शक्‍यता आहे.

भिडेवाड्याच्या स्मारकाच्या ठिकाणी सध्या शीट पायलींग, खोदाई व त्यानंतर मुख्य कामाला सुरुवात होईल. सात ते आठ महिन्यांत काम चांगले प्रगतिपथावर येईल.

- युवराज देशमुख, प्रमुख, विशेष प्रकल्प विभाग, महापालिका.

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळे स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडी झाली. फुले यांनी सुरू केलेली मुलींची पहिली शाळा भिडेवाड्यात भरली, त्यामुळे या वाड्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. स्मारकाचे काम लवकर पूर्ण झाल्यास नव्या पिढीला फुले दांपत्याचे कार्य समजून घेण्यास मदत होईल.

- किरण दाभाडे, विद्यार्थिनी

अशी आहेत भिडेवाडा स्मारकाची वैशिष्ट्ये...

- स्मारक तीन मजल्यांचे असणार

- स्मारकामध्ये सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट, प्रशिक्षण वर्गासाठी खोल्या

- दृकश्राव्य सादरीकरणासाठी खास व्यवस्था

- स्मारकाच्या कामासाठी महापालिकेकडून ७ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी