railway Tendernama
पुणे

Pune : पुणे रेल्वे स्थानकांवर यंदा नवा विक्रम होणार?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : दिवाळीत पुणे स्थानकावरून एका दिवसात सुमारे दोन ते अडीच लाख प्रवासी प्रवास करण्याचा अंदाज आहे.

उत्तर भारतात जाणाऱ्या विशेषतः दानापूर, गोरखपूर, लखनौ आदी गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी असते. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष उपाययोजना आखणार आहेत. यात जनरलच्या प्रवाशांना बसण्यासाठी ‘व्हीआयपी सायडिंग’जवळ सोय करण्यात येणार आहे.

तसेच प्रत्येक डब्यासमोर आरपीएफ व तिकीट निरीक्षक यांना तैनात करण्यात येणार आहे. यासाठी विशेष पथक देखील स्थापन करण्यात येणार आहे. याशिवाय आरक्षण केंद्रांवर व चालू तिकिटासाठी असलेल्या खिडकीची संख्या देखील वाढवली जाणार आहे. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.

पुणे स्थानकावर दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे दीड लाख आहे. दिवाळीत यात मोठी वाढ होते. यंदाच्या वर्षी रेल्वे प्रशासनाने जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. मात्र त्या जादा गाड्यांचे देखील आरक्षण फूल झाले आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे स्थानकावर असलेल्या आरक्षण केंद्रावरच्या खिडकीची व चालू तिकीट खिडकीची संख्या देखील वाढविण्यात येणार आहे. तसेच जनरल तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना रांगेत थांबावे लागू नये म्हणून ‘एटीव्हीएम’ मशिनची संख्या वाढवली जाणार आहे. प्रवाशांसाठी २४ तास सुरू राहणारा हेल्प डेस्क देखील असणार आहे.

जनरलसाठी रांग

दानापूर, लखनौ व गोरखपूरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. यातील बहुतांश प्रवासी कामगार असतात. ते आरक्षित तिकीट नाही मिळाले तर जनरलचे तिकीट काढून जनरलच्या डब्यातून प्रवास करतात. जनरलचे दोन डबे आणि प्रवासी हजारो असतात. त्यामुळे प्रवासी सीटवर बसण्यासाठी भांडण करतात. त्यामुळे रेल्वे प्रशासन जनरलच्या प्रवाशांना रांगेने डब्यात सोडते.

दिवाळीत होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत. प्रवाशांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था तर असेल याशिवाय गाड्यांचे परिचालन देखील वेळेवर होईल. स्थानकावरच्या गर्दीवर सातत्याने नजर असणार आहे.

- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे