Nagar Road Tendernama
पुणे

Pune: पुणे-नगर महामार्ग खरंच चकाचक होणार का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरातील ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ या संकल्पनेच्या धर्तीवर आता पुणे जिल्ह्यातही ‘स्वच्छ जिल्हा, सुंदर जिल्हा’ ही संकल्पना राबविली जाणार आहे. (Pune - Nagar Highway)

या संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महामार्गांवरील गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांची उभारणी करण्याचा निश्‍चय जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. या प्रकल्पासाठीच्या पहिल्या टप्प्यात पुणे-नगर या महामार्गावरील पाच गावांची निवड केली आहे. त्यामुळे सध्या महामार्गालगत टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याला आळा बसून सर्व महामार्ग स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे.

पहिल्या टप्प्यात पुणे-नगर महामार्गावरील आणि पुणे शहरालगत असलेल्या केसनंद, लोणीकंद, बकोरी, पेरणे आणि कोरेगाव भीमा या पाच गावांमध्ये हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. यासाठी स्थानिक प्रशासन, जिल्हा परिषद आणि सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर फंड) आदींच्या माध्यमातून निधीची उभारणी केली जाणार आहे. या पाच गावांतील प्रकल्पांच्या उभारणीनंतर टप्प्याटप्प्याने पुणे जिल्ह्यातील सर्वच महामार्गांवरील गावांमध्ये या प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे.

या प्रकल्पांच्या उभारणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या गावांचे सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी आणि गट समन्वयक आदींची संयुक्त बैठक घेतली आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांच्या उभारणीबरोबरच या गावांमध्ये निर्माण होणारा कचरा, त्या कचऱ्याचे व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनाची सद्यःस्थिती, सध्या गावात उपलब्ध असलेल्या स्वच्छताविषयक सुविधा आणि भविष्यात आवश्‍यक सुविधा आदींची माहिती या बैठकीत घेण्यात आली.

सध्या महामार्गाच्या कडेला ठिकठिकाणी कचरा टाकला जात आहे. यामुळे दुर्गंधी सुटून, त्याचा प्रवाशांना त्रास होत आहे. हे टाळण्यासाठी महामार्ग हे स्वच्छ रहावेत, यासाठी गावातील कचरा गावातच जिरला पाहिजे. जेणेकरून तो महामार्गाच्या आजूबाजूला टाकला जाणार नाही, हा या प्रकल्प उभारणीमागचा हेतू असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे यांनी सांगितले.

सद्यःस्थितीत महामार्गालगतच्या गावात रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत अनोळखी व्यक्ती कचरा टाकत आहेत. त्यामुळे या महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसत आहे. अशा पद्धतीने महामार्गाच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचू नयेत, महामार्ग अस्वच्छ राहू नयेत, यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून या महामार्गावरील गावांमध्ये कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

कचरा व्यवस्थापन प्रकल्पांचे संभाव्य फायदे
- महामार्ग कचरामुक्त होण्यास मदत
- रस्त्याच्या कडेवरील कचऱ्यामुळे सुटणारी दुर्गंधी कमी होणार
- गावे कचरामुक्त होणार
- कचऱ्याच्या माध्यमातून सेंद्रिय खताची निर्मिती करता येणार
- इंधन आणि खतांच्या विक्रीतून ग्रामपंचायतींना आर्थिक उत्पन्न मिळणार
- गाव आणि महामार्गावर शाश्वत स्वच्छता राहणार
- पर्यावरण रक्षणासाठी मदत होणार
- प्रवाशांसाठी आरोग्यदायी वातावरण निर्मिती होणार

गावासाठी उपलब्ध होणाऱ्या सुविधा
- नियमितपणे कचरा संकलन होणार
- कचरा वाहून नेण्यासाठी वाहन व्यवस्था होणार
- कचऱ्यावर प्रक्रिया करता येणार
- कचरा व्यवस्थापन प्रकल्पातून सेंद्रिय खताची निर्मिती होणार
- इंधन निर्मिती होणार