Vikram Kumar, PMC Tendernama
पुणे

Pune : 'त्या' 23 गावांच्या समस्या आता तरी सुटणार का? 'या' अधिकाऱ्याकडे तबब्ल 12 गावांची जबाबदारी!

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेत (PMC) समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रशासनातर्फे चार उपायुक्त, आठ सहाय्यक आयुक्त आणि १६ संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी संदर्भात परिपत्रक काढले आहे. विशेष म्हणजे उपायुक्त आशा राऊत यांच्याकडे १२ गावांची जबाबदारी दिली आहे.

पुणे महापालिकेने जुलै २०२१ मध्ये हद्दीलगतची २३ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. पण या गावांतील पाणी, कचरा, रस्ते, सांडपाणी, पावसाळी गटार, पथदिवे यांचा अभाव असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

या संदर्भात विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली आहेत. विधिमंडळ अधिवेशनातही यासंबंधी प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर या गावांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींची समिती गठित करण्यात येणार होती. याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला असला तरी त्यास अद्याप मान्यता मिळालेली नाही.

दरम्यान, आयुक्तांनी या गावांमध्ये सुविधा पुरविण्यासाठी आणि समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करताना गावाची हद्द व लोकसंख्या लक्षात घेत २३ गावांची जबाबदारी वाटप करण्यात आली आहे. वाघोली, बावधन बुद्रुक ही दोन्ही गावे मोठी असल्याने या गावांसाठी एक उपायुक्त, एक सहाय्यक आयुक्त, दोन संपर्क अधिकारी आहेत. तर उर्वरित गावांसाठी स्वतंत्र अधिकारी न देता उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांना दोनपेक्षा जास्त गावांची जबाबदारी दिली आहे.

अशी असेल जबाबदारी...

किशोरी शिंदे - वाघोली

संतोष वारुळे - म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक

आशा राऊत - कोपरे, कोंढवे-धावडे, सणसनगर, नांदोशी, नऱ्हे, नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी

प्रसाद काटकर - औताडे-हांडेवाडी, होळकरवाडी, शेवाळेवाडी, मांजरी बुद्रुक,गुजर-निंबाळकरवाडी, पिसोळी, वडाचीवाडी