Pune Tendernama
पुणे

Pune: कर्वे रस्त्यावरील नो पार्किंगचा वाद चिघळणार? आंदोलनाचा इशारा

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कर्वे रस्त्यावरील (Karve Road) नो पार्किंग (No Parking) हटविण्यासाठी कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) संयुक्तपणे येत्या तीन दिवसांत आंदोलन करणार असल्याची घोषणा गुरुवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली. दरम्यान, चार वर्षांपासून सुरू असलेले ‘नो पार्किंग’ काढण्याचा निर्णय घेण्यासाठी पाहणी करून निर्णय घ्यावा लागेल, अशी भूमिका वाहतूक पोलिसांनी घेतली आहे.

मेट्रो, उड्डाण पुलाची कामे पूर्ण झाली असल्यामुळे कर्वे रस्त्यावरील ‘नो पार्किंग’ रद्द करून तेथे दुतर्फा वाहने उभी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशन गेल्या दोन महिन्यांपासून वाहतूक पोलिस आणि महापालिकेकडे करीत आहे.

वाहतूक पोलिसांच्या एक पथकाने कर्वे रस्त्याची पाहणी करून काही ठिकाणी दुचाकी तर, काही ठिकाणी चार चाकी वाहने उभी करण्यास परवानगी देता येईल, असे पत्र २८ मे रोजी वाहतूक उपायुक्त कार्यालयाला पाठविले होते. परंतु, उपायुक्त कार्यालयातून त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे मनसेच्या जनाधिकार सेनेचे अध्यक्ष हेमंत संभूस यांनी पार्किंगसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशन आणि संभूस यांची गुरुवारी बैठक झाली. त्यात येत्या तीन दिवसांत संयुक्त आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका तसेच राजेश मेहता, बक्षीसिंग तलवार, संजय शहा, शैलेश संत, क्षमा वाघ, नंदू भटेवरा आदी सहभागी झाले होते. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनीही व्यापाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला असून खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचीही गैरसोय होत असल्याकडे लक्ष वेधले.

खंडुजीबाबा चौक ते कर्वे पुतळ्या दरम्यान सुमारे ५०० हून अधिक व्यावसायिक कर्वे रस्त्याच्या दुतर्फा व्यवसाय करतात. नो पार्किंगमुळे गेल्या चार वर्षांपासून सर्वांच्याच व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. नो पार्किंग पोलिसांनी लागू केले, परंतु पार्किंग कोठे करायचे, हेही त्यांनी सांगायला पाहिजे होते.
- ओमप्रकाश रांका, अध्यक्ष, कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशन

कर्वे रस्त्यावर चार वर्षांपासून पार्किंग बंद करण्यात आले आहे. आता हे नो पार्किंग उठवायचे कारण काय? या बाबत पाहणी करू, विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेऊ.
- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा