Pune Tendernama
पुणे

Pune : अजितदादांचा आदेश पालिका पाळणार का? पुण्यातील 'त्या' कचरा प्रकल्पाचे काय होणार?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : बाणेर येथील सूस रस्त्यावरील कचरा प्रकल्प ३१ डिसेंबरपर्यंत बंद करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बैठकीत दिले आहेत. त्यानंतरही प्रशासनाकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने बुधवारी महापालिकेत माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. अखेर यावर बैठक घेऊन तोडगा काढला जाणार आहे.

महापालिकेने २०१६ मध्ये सूस रस्त्यावर नोबेल एक्स्चेंज कंपनीचा कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. येथे शहरातील हॉटेलमधील ओला कचरा येतो. परिणामी, परिसरात दुर्गंधी पसरत असून स्थानिकांना घराच्या बाहेर पडणेही कठीण झाले आहे, त्यामुळे याविरोधात स्थानिकांनी ऑक्टोबर २०२० राष्ट्रीय हरित लवादात (एनजीटी) याचिका दाखल केली होती. त्यात सर्वोच्च न्यायालयानेही नागरिकांच्या बाजूने निर्णय देत दोन महिन्यांत प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले. परंतु नवीन जागा मिळत नसल्याचे कारण सांगत महापालिका गेल्या तीन वर्षांपासून प्रकल्प स्थलांतरित करण्यास टाळाटाळ करत आहे.

यासंदर्भात नोव्हेंबरमध्ये माजी आमदार मेधा कुलकर्णी व स्थानिकांनी पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेअंती महापालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत हा प्रकल्प बंद करण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, अद्याप प्रकल्प बंद झालेला नाही, उलट जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.

आदेशांकडे दुर्लक्ष करत असल्याने बुधवारी माजी आमदार कुलकर्णी यांनी नागरिकांसह अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली. या वेळी खेमनार यांनी प्रशासनाची बाजू मांडली, परंतु त्यावर नागरिकांचे समाधान झाले नाही. त्यावरून कुलकर्णी व खेमनार यांच्यात खडाजंगी झाली.

खेमनार हे उठून अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळी ३१ डिसेंबरपर्यंत हा प्रकल्प बंद केला जाईल, असे आश्‍वासन देण्यात आले. न्यायालयाचा आदेशही आहे त्यानुसार कार्यवाही करावी लागेल, असे कुलकर्णी यांनी सांगितले. त्यावर बैठक घेऊन तोडगा काढू असे आश्‍वासन देण्यात आले.

कचरा प्रकल्प बंद करण्यासंदर्भात बैठक घेतली जाणार आहे. त्यामध्ये तोडगा काढला जाईल.

- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

पालकमंत्र्यांच्या बैठकीत ३१ डिसेंबरपर्यंत सूस रस्त्यावरील कचरा प्रकल्प बंद करण्याचे आश्‍वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिले. परंतु, तशी कार्यवाही होत नसल्याने खेमनार यांची भेट घेतली. त्यांनी व्यवस्थित उत्तरे दिले नाहीत, वाद झाल्याने ते उठून गेले. अखेर बिनवडे यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे कार्यवाही होईल असे सांगितले.

- मेधा कुलकर्णी, माजी आमदार, कोथरूड